रायगडच्या निवडणूक यंत्रणेचे सुकाणू रणरागिणींच्या हाती!
By निखिल म्हात्रे | Published: April 7, 2024 06:11 PM2024-04-07T18:11:45+5:302024-04-07T18:11:57+5:30
- महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसह प्रशासनात ६५ टक्के महिला कार्यरत
अलिबाग: मतदारांची वाढलेली संख्या, दीड महिना आधीपासूनच प्रचाराला आलेली रंगत आदी वैशिष्ट्ये यंदा रायगड लोकसभा मतदारसंघात असतानाच निवडणूक यंत्रणा सांभाळणाऱ्या यंत्रणेत तब्बल ६५ टक्के महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत, हे आणखी एक मोठे वैशिष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या नेतृत्वाखाली या महिला त्यांचे निवडणुकीचे काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहेत.
निवडणुकीच्या कामकाजात रायगडच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडीयार, रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा विखे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव या तर मुख्य भूमिका सांभाळत आहेत.
निवडणूक यंत्रणेत अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजे प्रशिक्षण. पण, या कामाची जबाबदारी रायगड जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्षा अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार या अत्यंत प्रभावीपणे सांभाळत आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचे अखेरच्या क्षणापर्यंत अद्ययावतीकरण, निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ततेकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया, याबरोबरच मतदान यंत्रे याबरोबरच एकूणच निवडणूकविषयक सर्व कामकाजाचे समन्वय आदी अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे या सांभाळत आहेत.
जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अचूक व अधिकृत माहिती देण्याबरोबरच माध्यम प्रमाणीकरण समितीच्या सदस्य सचिव आहेत. उमेदवार प्रचार साहित्याला परवानगी देणे, पेड न्यूज तपासणे तसेच मीडियाला आवश्यक माहिती पुरविणे हे काम त्या प्रभावीपणे सांभाळत आहेत. तर मतदान केंद्रासह निवडणूक निकालादरम्यान लागणारी आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम डॉ. मनीषा विखे करीत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्यावर मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आदिवासी नागरिकांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीची जबाबदारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांच्यावर दिली आहे. त्यांचे पथक आदिवासी वाड्यांवर जाऊन मतदानाची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तर, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव या विद्यार्थ्यांमार्फत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. रायगड जिल्ह्याचा खासदार ठरविण्यात जसा महिलांचा प्रमुख वाटा आहे तसेच निवडणूक कामकाजात देखील महिला अधिकारी व कर्मचारी यांची मोठी संख्या आहे. ही संख्या तब्बल ६५ टक्के आहे.