रायगडची एचआयव्हीमुक्तीकडे वाटचाल; रुग्णांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:41 AM2020-12-19T00:41:29+5:302020-12-19T00:41:45+5:30
जिल्ह्यात ४१७ एचआयव्ही संसर्गित रुग्ण
- निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात ४१७ (०.६८ टक्के) एचआयव्ही संसर्गित रुग्ण होते. नोव्हेंबर, २०२० पर्यंत हीच संख्या अवघ्या १६० (०.३ टक्के) वर येऊन ठेपली आहे. या घटत्या आकडेवारीवरून रायगडची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची, एचआयव्ही-टीबी, ग्रेटर इन्व्हॉलमेंट ऑफ पीपल लिविंग विथ एचआयव्ही एड्स (जिपा) या समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाने मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन, रायगड जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गिताचे प्रमाण घटत असल्याचे सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेमध्ये ज्याप्रमाणे एचआयव्ही संसर्गित रुग्णसंख्या घटत आहे. त्याचप्रमाणे, एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत असल्याचे दिसून येत आहे. हे जिल्ह्यातील दिलासादायक चित्र आहे
जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ४१ हजार ४३० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २९ माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्या होत्या. या सर्व माता एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे, तर नोव्हेंबर, २०२० पर्यंत २५ हजार ७२९ गरोदर मातांची तपासणी झाली असून, त्यामध्ये अवघ्या २० माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या माता एआरटी उपचार घेत आहेत.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ठोकळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (डापकू) संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन.एच.एम. डॉ.चेतना पाटील, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी
केंद्र-अलिबागचे डॉ.पांडुरंग शिंदे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१५ बालकांची डीबीएस तपासणी
२०२०-२१ मध्ये एकूण १५ बालकांची डीबीएस (ड्राय ब्लड स्पॉट) तपासणी करण्यात आली असून, १५ (१०० टक्के) बालके एचआयव्ही संसर्गित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ईएमटीसीटी कार्यक्रमांतर्गत मातेकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये शासनाला १०० टक्के यश आले आहे, तसेच जिल्ह्यामधील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखान्यांमध्ये एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रात मोफत एचआयव्ही समुपदेशन उपलब्ध करण्यात आले आहे.