जयंत धुळप
अलिबाग - मावळ मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठीरायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत. मात्र, कर्जत तालुक्यातील 4 दूरवरील आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहचलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणाऱ्या या पथकांशी सातत्याने संवाद साधत होते.
वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. गावकऱ्यांनीदेखील उत्स्फुर्तपणे त्यांचे स्वागत केले. रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन तालुके मावळ मतदारसंघात येतात. यातील कर्जतमधील 54 क्रमांकाचे केंद्र तुंगी येथे असून डोंगरमाथ्यावरील या गावात 344 मतदार आहेत. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर 27 किमी असून केवळ कच्च्या रस्त्याने अथवा पायवाटेनेच याठिकाणी पोहोचता येते. 274 मतदार संख्या असलेले पेठ याठिकाणी देखील 101 क्रमांकाचे मतदान केंद्र असून याठिकाणी जीपने जाता येते. मात्र, रस्ता अवघड आहे. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर 24 किमी आहे. 177 मतदार असलेले ढाक या वाडीमध्ये 156 क्रमांकाचे मतदान केंद्र असून मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर 10 किमी आहे. येथेही अवघड अशा रस्त्याने जावे लागते. 100 मतदार असलेले कळकराई हे 169 क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. हेदेखील केवळ छोट्या वाटेने जाण्यासारखे आहे.
स्थानिक गावकरी, तलाठी, तसेच इतरांनीही या कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य वाहून नेण्यासाठी मदत केली. लोकशाहीचा हा उत्सव पार पाडण्यासाठी मतदारांप्रमाणेच निवडणूक कर्मचारीहा झटताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांची कसरत पाहून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त न्यूटन चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मतदारांसाठी कायपण म्हणत, आपले कर्तव्य बजावताना, हे कर्मचारी भारतीय लोकशाहीला बळकट करत आहेत.