माथेरान : माथेरानकरांच्या एकीला यश मिळाले असून नुकतेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या शिष्टमंडळाने माथेरान स्थानकास १ आॅक्टोबर रोजी तातडीची भेट दिली. त्यामुळे अमन लॉज- माथेरान शटलसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.माथेरानमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन रेल्वेचे डीआरएम जैन यांची भेट घेऊन माथेरान शटलसेवा सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते, त्यास रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखवत माथेरान स्थानकास भेट देऊन पाहणी केली. माथेरानच्या पर्यटनवाढीस मिनीट्रेन सुरू असणे महत्त्वाचे आहे. मिनीट्रेन बंद झाल्यावर माथेरानकरांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला होता; त्यामुळे मिनीट्रेन पुन्हा सुरू व्हावी म्हणून माथेरानकर प्रयत्नशील आहेत. त्यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देताच रेल्वेच्या अधिकारी शिष्टमंडळाने माथेरान स्थानक येथे भेट देऊन शटलसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाहणी केली. या वेळी सहायक उपव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे सुचविले आहे; त्यानुसार येथे इंजिन व बोगीच्या डागडुगीसाठी एक सुसज्ज लोकोशेड असावे, असे सुचवले तर माथेरानमध्ये शक्य न झाल्यास नेरळहून वाहनातून बोगी आणून शटलसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करून पाहावा, असेही ठरले. माथेरानमध्ये रेल्वे सेवा सुरू करण्यास माथेरान पालिका सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे माथेरानचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले. नेरळ-माथेरान सेवा लवकर सुरू होणार नसल्याने निदान अमन लॉज-माथेरान शटलसेवा तरी सुरू राहवी, अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी माथेरान स्थानकामध्ये माथेरानकरांनी मध्य रेल्वेचे उप महाव्यवस्थापक आशुतोष गुप्ता, लोकोशेड व्यवस्थापन, रेल्वे ट्रॅक व्यवस्थापक आदी अधिकाºयांशी चर्चा केली. याबाबतलवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
अमन लॉज-माथेरान शटलसेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 2:44 AM