कर्जत-भिवपुरी स्थानकांदरम्यान रेल्वेरुळाला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:29 AM2020-03-03T00:29:15+5:302020-03-03T00:29:19+5:30

मध्य रेल्वेच्या कर्जत व भिवपुरी रोड या स्थानकांदरम्यान रेल्वेरुळाला तडा गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

Railway lines break between Karjat-Bhiwapuri stations | कर्जत-भिवपुरी स्थानकांदरम्यान रेल्वेरुळाला तडे

कर्जत-भिवपुरी स्थानकांदरम्यान रेल्वेरुळाला तडे

Next

नेरळ : मध्य रेल्वेच्या कर्जत व भिवपुरी रोड या स्थानकांदरम्यान रेल्वेरुळाला तडा गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुंबई दिशेकडील वाहतूक काही काळाकरिता ठप्प झाली होती. यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा झाला. मात्र, मध्य रेल्वेच्या विभागाने एक तासाच्या आत शर्थीचे प्रयत्न करून ही सेवा पूर्ववत केली.
सोमवार २ मार्च रोजी सकाळी मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातून ९ वाजून ६ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लोकल सुटली. आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी चाकरमानी हे या गाडीने प्रवास करत होते. तर पुढील भिवपुरी रोड रेल्वेस्थानकावर या गाडीची प्रवासी वाट पाहत उभे होते. मात्र, सावरगाव येथील पोल क्रमांक ९६/२१ येथे आली असता रेल्वेरुळाला तडा गेल्याचे गाडीचालकाच्या लक्षात आल्याने त्याने लोकल थांबविली. त्यानंतर रेल्वे विभागाला ही बाब कळवताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व साधनांसह कर्जतच्या दिशेने धाव घेतली.
सकाळची वेळ, त्यात सोमवार त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्याची घाई होती. त्यामुळे या लोकलच्या मागे एक एक करून अनेक गाड्या थांबायला सुरुवात झाली होती. त्यामुळे रेल्वे विभागाने शर्थीचे प्रयत्न करून सुमारे एक तासाच्या आत रेल्वेरूळ पूर्ववत केला.
या कालावधीत कर्जत-मुंबई मार्गावर एकही एक्सप्रेस गाडी जाणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला नाही. त्याच वेळी केवळ कर्जत येथून ९.४७ला मुंबईकरिता सुटणारी लोकल १५ मिनिटे उशिरा कर्जत येथून सोडण्यात आली, तसेच कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस हीदेखील २० मिनिटे उशिराने मुंबईकरिता कर्जत स्थानकातून रवाना करण्यात आली.

Web Title: Railway lines break between Karjat-Bhiwapuri stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.