लोकांच्या मागणीनुसारच रेल्वे टर्मिनस होईल : प्रमोद जठार
By admin | Published: November 16, 2014 09:40 PM2014-11-16T21:40:53+5:302014-11-16T23:47:07+5:30
रेल्वेच्या समस्यांबाबत आम्ही रेल्वेमंत्री तसेच राज्यातील इतर समस्या कशा सोडवाव्यात, यासाठी प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे.
सावंतवाडी : रेल्वे टर्मिनस कुठे करायचे, हा सर्वस्वी निर्णय जनतेवर अवलंबून असून लोकांची मागणी ज्या ठिकाणी असेल तेथेच रेल्वे टर्मिनस होईल, अशी माहिती भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, राजन म्हापसेकर, काका कुडाळकर, श्यामकांत काणेकर, मनोज नाईक, उमेश कोरगावकर, राजू राऊळ उपस्थित होते.जठार म्हणाले, सिंधुदुर्ग भाजपाच्या जनसंपर्क अभियानाची सुरूवात रविवारपासून झाली. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केला. तसेच यापुढे ही भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढेल. या बैठकीत प्रामुख्याने भाजप जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक लढवणार, यावर ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच सहकारामधील ही निवडणूक लढवण्याबाबत एकमत झाले आहे, असे जठार म्हणाले.जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रमोद जठार यांची वर्णी लागावी, असा ठराव दोडामार्ग व सावंतवाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील सीवर्ल्डचा प्रश्न किंवा विमानतळ हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात येणार असून समिती जनतेला विश्वासात घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. यामध्ये रेल्वे टर्मिनसचा ही मुद्दा असून टर्मिनस कुठे व्हावे, हे जनतेनेच ठरवावे, असे सांगत लवकरच रेल्वेच्या समस्यांबाबत आम्ही रेल्वेमंत्री तसेच राज्यातील इतर समस्या कशा सोडवाव्यात, यासाठी प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे.यापुढे भाजप सरकार जनतेपर्यंत जाईल तसेच जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक महिन्याला मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊन भाजपचे सध्या जनसंपर्क अभियान सुरू असून हे अभियान संपल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना कोणती जबाबदारी द्यायची, याचा विचार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)