जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच
By admin | Published: September 25, 2016 04:14 AM2016-09-25T04:14:15+5:302016-09-25T04:14:15+5:30
सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील
अलिबाग : सतत सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाचा मोठा फटका अलिबाग व पेण तालुक्यांतील ११ गावांना बसला असून सखल भागातील घरांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. अलिबाग तालुक्यातील चरी, ताडवागळे, पेझारी, देहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे तर पेण तालुक्यातील पाटणी व पांडापूर या गावांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
सर्व गावांतील नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु असून ते प्राप्त झाल्यावर नेमक्या किती घरातील किती कुटूंबाचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, या बाबत माहिती स्पष्ट होईल, असेही पाणबुडे यांनी पुढे सांगीतले.
पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी येथे दरड कोसळल्याने १० घरे, १ विहिर व १ प्रवासी निवारा शेडचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कोतवाल खुर्द व कोतवाल बुद्रुक येथे नळपाणी पुरवठा करणाऱ्या ५ विहिरींची पडझड झाली आहे. तर २ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. बस प्रवासी निवारा शेडचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर येथील नळपाणी पुरवठा करणारी एक कोसळली असून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.
चरी गावांतील डिजिटल जि.प.शाळेसह सुमारे ६० घरांचे नुकसान
शुक्रवार रात्रीच्या धुव्वाधार पावसाने अलिबाग तालुक्यांतील चरी गावास मोठा तडाखा दिली असून या गावातील डिजिटल जि.प.शाळेत पुराचे पाणी घुसल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षा विजया देविदास भगत व सदस्य सुधीर जाधव यांनी दिली आहे. गावांतील सुमारे ६० घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
ताडवागळे व वाघोडेमध्ये भातशेतीची मोठी हानी
ताडवागळे व वाघोडे ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक घरामध्ये पाणी जाऊ न मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळघर येथील बंधाऱ्याचे कठडे वाहून गेले असून आजुबाजूच्या शेतात पाणी गेल्याने परिसरातील शेकडो हेक्टर भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जलशोषण क्षमता कमी झाल्याने
जमीन खचण्यास सुरुवात
गेल्या ७२ तासांपासून पावसाच्या कहराने गेल्या २४ तासात रुद्रावतार धारण केला आहे. सततच्या पावसाने आता जमीनीतील जलशोषण क्षमता कमी होवू लागली असल्याने रस्ता खचणे, दरडीची माती ढासळणे, गावांगावात रस्त्यावर पाणी साचून राहाणे आणि त्यातच पाऊस कोसळतच असल््याने सखल भागांतील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे.
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे तहसिलदारांचे आश्वासन
देहेन, भाकरवड, कोळघर, वाघोडे या भागात पुराने हाहाकार उडविल्याचे वृत्त समजताच रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती चित्रा पाटील, आस्वाद पाटील यांनी अलिबाग तहसिलदार यांचेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला व नुकसानीचे पंचनामे करणेचे निर्देश दिले. अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी नुकसान भरपाईने देण्यात येणार असल्याची माहिती दिले.