बिरवाडी : महाड तालुक्यातील महाड एमआयडीसी बिरवाडी परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातले असून मंगळवार, २२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परतीचा पाऊस सायंकाळी सुरू होत असल्याने भातपिकाच्या कापणीची कामे रखडली आहेत. परतीच्या पावसाच्या मोठमोठ्या सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने भातपिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विजांचा कडकडाटासह वारा पाऊस पडत असल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली होती. शेतांमध्ये पीक उभे राहिलेले असताना परतीच्या पावसाने ओला दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.