पेण तालुक्यात पावसाने भाताचे पीक जमीनदोस्त; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:12 AM2020-10-06T00:12:32+5:302020-10-06T00:12:37+5:30
वादळी वाऱ्याचा फटका; शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी
पेण : खरीप हंगाम संपत आला असताना अंतिम चरणातील उत्तरा आणि हस्त नक्षत्रात पडलेल्या वादळी वाºयासह जोरदार पावसाने संपूर्ण भातशेती आडवी झाली असून, काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षाकाठी जिरायती भातशेतीच मोठे आर्थिक नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नुकसानीची कशी भरपाई करून मिळणार, यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी पेणमधील शेतकºयांची मागणी आहे.
पेण तालुक्यातील १८४ महसुली गावांमधील १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. २२ मार्च, २०२०पासून देशात कोरोना संसर्गाची लागण व शासनाने जाहीर केलेल्या लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक शेतीकडे वळले. प्रारंभीची पावसाची नक्षत्र खरीप हंगामात अनुकूल ठरली होती.त्यानंतर भातशेती बहरली १०० दिवसांची गरवी पिके जोमात आली. त्या बरोबरीने १२० दिवसांची हळवी पिकेही त्याच पद्धतीने जोमदार निपजली असताना, उत्तरा नक्षत्रच्या पंधरा दिवसांच्या संततधार पावसामुळे भात पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये खारभूमी क्षेत्रात शेतीची मोठे नुकसान झाले. त्यानंतर, हस्त नक्षत्रात ३ आॅक्टोबर रोजी प्रचंड मेघगर्जनेसह वादळी वाºयासह पाऊस पडून संपूर्ण तयार झालेल्या भाताची पिके जमीनदोस्त केली आहेत. यामध्ये मोठं आर्थिक नुकसान होऊन शेतकरी बांधवांमधे नैराश्य पसरलं आहे. कोरोना महामारीत शेतीच्या वर्षाकाठी एकदाच येणाºया उत्पन्नावर शेतकरी बांधवांची भिस्त होती.
नैसर्गिक आपत्तीचे संकट
गतवर्षीप्रमाणे पावसाने या वर्षीही शेतकºयांच्या पदरात पडणाºया शेती उत्पादनावर असे नैसर्गिक आपत्तीच संकट उभे केल्याने आता मिळणाºया तुटपुंज्या उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे. ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनाने शेतकरी संकटात सापडला असल्याने मदतीचा
हात द्यावा, अशी पेणमधील शेतकºयांची मागणी आहे.