रायगड जिल्ह्यात पहाटेपासून धो-धो पाऊस, आंबेनळी घाटातून संथ गतीने वाहतूक सुरू
By राजेश भोस्तेकर | Published: June 28, 2023 08:17 AM2023-06-28T08:17:11+5:302023-06-28T08:20:19+5:30
जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी पहाटे पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. ढगांचा गडगडाटसह मुसळधार पाऊस पडत आहे. आंबेनळी घाटात रात्री रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळे दोन्ही कडची वाहतूक ठप्प झाली होती. रिस्क्यू पथकाने दरडीचा काही भाग काढला असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू झाली. मात्र, यानंतर आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याला ३० जून पर्यंत ओरेज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पहाटे पासून सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे.समुद्र, नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. दरड ग्रस्त भागातील नागरिकांनाही परिस्थिती पाहून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
मुसळधार पावसाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहाटे पासून सुरू झालेल्या पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. अलिबाग तालुक्यातील सागव फिडरवरील ग्राहकांना मध्यरात्री पासून अंधारात रात्र काढावी लागली आहे. जिल्ह्यातही अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.
पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा.
- सोमनाथ घार्गे (पोलीस अधिक्षक, रायगड)