पनवेल - पनवेल तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. आजही तालुक्यात ग्रामपंचायती अस्तित्वात असल्या तरी या ग्रामपंचायती सभोवताली मोठ्या प्रमाणात शहरीकरण मोठ मोठे प्रकल्प येऊ घातल्याने ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. पनवेल मधील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्जाचे पाऊस पडलेले पहावयास मिळत आहे.
17 ग्रामपंचायतीत 175 सदस्य तर 17 थेट सरपंच निवडून येणार आहेत. या 175 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 582 अर्ज तर 17 थेट सरपंच पदासाठी 85 अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांना दि.20 रोजी प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी दि.23 रोजी होणार असून दि. 25 अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने निवडणुकीचे चित्र या दिवशी स्पष्ट होणार आहे.
17 ग्रामपंचायतींमध्ये दूदरे,दापोली,चिखले,विचुंबे,देवद,सोमटणे,ओवळे,भिंगार,गिरवले,कसलखंड,मालडुंगे,वावेघर,न्हावे,तुराडे,कोण, गुळसुंदे,वाघिवली या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.शहरीकरणामुळे सर्वच ग्रामपंचायती श्रीमंत झाल्या असल्याने या निवडमुकीत चुरस निर्माण झाली आहे.विशेषतः विमानतळ गाभा क्षेत्रातील दापोली,वाघिवली,ओवळे या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित क्षेत्रात देखील ग्रामपंचायती निवडणुका पार पडणार आहेत.येऊ घातलेल्या विमानतळ प्रकल्पामुळे याठिकाणच्या ग्रामस्थांसमोर अनेक आव्हाने निर्माण होणार असल्याने या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका महत्वाच्या मानल्या जात आहेत.तालुक्यात भाजप विरुद्ध शेकाप महाविकास अशीच लढत पहावयास मिळणार आहे.मात्र स्थानिक प्रश्नांवरच निवडणुका लढविल्या जाणार आहेत.17 ग्रामपंचायतीत पूर्वीपासून शेकापचे वर्चस्व राहिले आहे.