रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:13 AM2018-07-11T02:13:35+5:302018-07-11T02:14:42+5:30

रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे.

Rain In Raigad district | रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

अलिबाग - जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. गतवर्षी याच दिवशी १९ हजार १५६ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अल्पावधीत अधिक पर्जन्यमान झाले आहे.
पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १९५ मि.मी. पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड-७३, तळा-१४५, माणगाव-१८३, श्रीवर्धन-१२, महाड-१८६, अलिबाग-१०४, पोलादपूर-८१, पेण-८०, कर्जत-१४१, खालापूर-११८, उरण-१८८, पनवेल-१८०, सुधागड-८७, म्हसळा-६१ तर गिरिस्थान माथेरान येथे १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १२३ मि.मी. झाले आहे.

नागोठणे ठप्पच; संततधार सुरूच
1नागोठणे : पावसाचे थैमान चालूच असल्याने सलग चौथ्या दिवशी शहरात पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मटण मार्केट, लेक व्ह्यू हॉटेल भागात पुराचे पाणी भरले आहे. एसटी बसस्थानकात दोन फूट पाणी असल्याने एसटी बसची महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडून धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याबाबत विचारणा केली असता, सायंकाळी ५ पर्यंत अशा प्रकारचा कोणताही अधिकृत संदेश आला नसल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

उरणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प
2उरण : मुसळधार पावसामुळे एमटीएनएलचे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने उरण, जेएनपीटी, शेवा, एनएएडी आदी परिसरातील इंटरनेट सेवा पाचव्या दिवशीही सुरळीत झालेली नाही. परिणामी, सुमारे तीन ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. उरण परिसरात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे उरण टेलिफोन एक्सचेंजमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील इंटरनेट सेवा मागील पाच दिवसांपासून ठप्प झाली आहे. परिणामी, व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. बिघाड दूर करण्यासाठी तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे एक्सचेंजमधील ओएफएस बिघाड दूर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती उरण टेलिफोन एक्सचेंजचे विभागीय व्यवस्थापक पी. जी. बळकटे यांनी दिली. व्यापारी, बँका, ग्राहक सेवेवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने उरण टेलिफोन एक्सचेंजच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक, ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विमानतळबाधित गावांत शिरले पाणी


पनवेल : चार दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत पनवेल परिसरात तब्बल १८0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विमानतळबाधित पारगाव आणि डुंगी या गावांत मंगळवारी पुन्हा पाणी शिरल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भरपावसात राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.
पनवेल शहरासह संपूर्ण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर कायम होता. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या, तसेच शहरातील सर्व नालेदेखील ओसंडून वाहत आहेत. ग्रामीण भागातदेखील हीच अवस्था आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, लहान पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदगाव, उमरोली, बारापाडा, डोलघर, तुर्भे, करवले आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक धिमी झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागझरी गावात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. शहरातील मैदाने, उद्यानांना जणू गार्डनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कळंबोली, खारघर, तसेच पनवेल शहरातील काही भागात या वेळी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.\


 

Web Title: Rain In Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.