रायगडमध्ये दुसऱ्या दिवशी धुंवाधार, एसटीचे वेळापत्रक कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:58 AM2019-06-29T01:58:01+5:302019-06-29T01:58:56+5:30
सलग दुस-या दिवशीही पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने धुंवाधार बरसून सर्वांनाच सुखद धक्का दिला.
अलिबाग - सलग दुस-या दिवशीही पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने धुंवाधार बरसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. घरामध्ये तर काही ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये पावसाचे पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. एसटी स्थानकातून सुटणाºया गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडून पडले. काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाड पडण्याच्या घटनेमुळे शहरातील वीज सुमारे तीन तास गायब होती. पावसाच्या आगमननाने पुढील कालावधीत शेतीच्या कामांना सुरुवात होण्यातील अडथळा दूर झाला आहे. अलिबाग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाºया पावसामुळे काही भागात रस्त्याच्या लगत असलेली झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूकही थांबली होती. अलिबाग शहरातील पी.एन.पी. नगरमधील मुख्य रस्ता, जुने भाजी मार्केट, शास्त्रीनगरमधील काही सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना व वाहचालकांना रस्ता पार करताना कसरत करावी लागत होती. किनारपट्टीवरील गावांना समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांनी चांगलेच झोडपले.
माथेरान घाटात दरड कोसळली
नेरळ : नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शुक्रवारी पहाटे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. पहिल्याच पावसात दरड कोसळली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी माती आणि छोट्या दगडी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. टॅक्सी संघटनेने रस्त्यावरील माती आणि दगडी बाजूला केल्याने वाहतूक काही काळाने सुरळीत झाली. नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील नागरखिंड येथे ही दरड कोसळली आहे.
नेरळ-माथेरान घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने नव्याने तयार केला असून, घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. त्या दरडींना रोखण्यासाठी गेली अनेक वर्षे या घाटरस्त्याला संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे; परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने या घटना दरवर्षी वाढत आहेत. तसेच रस्त्याला लोखंडी जाळ्या आणि नेट बसविण्यात यावेत, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनीही राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री यांना केली होती; परंतु याची दखल अद्याप घेतली गेली नसल्याने या घटना घडत आहेत.
माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन वगळता नेरळ-माथेरान घाटमार्ग सोडला तर अन्य कोणताही मार्ग नाही. त्यामुळे पावसाळ्यात बंद असलेल्या मिनीट्रेननंतर नेरळ-माथेरान घाटरस्ता दरडी कोसळून बंद पडण्याच्या घटना घडत असतात. महिनाभरापूर्वीच घाटरस्त्याचे डांबरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी केले आहे. मात्र, या घाटरस्त्यात काही धोकादायक वळणे असून त्या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी नेट बसविणे गरजेचे आहे. या घाटरस्त्यात दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार घडतात आणि परिणामी घाटरस्ता काही काळाकरिता बंद होतो. या सर्वांचा विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे.
माथेरानला मोठ्या प्रमाणात होणाºया पावसामुळे या घाटरस्त्यात अनेक धबधबे आहेत. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटामधील काही भाग हा अत्यंत धोकादायक बनला आहे. माथेरानचा हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि जीवितहानी टाळण्यासाठी यापुढे तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा.
काही काळ वाहतूक ठप्प : संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी
ज्याप्रकारे खंडाळा-लोणावळा एक्स्प्रेस हायवे लगत दरडी कोसळू नयेत म्हणून नेट बसवून रस्ता संरक्षित करण्यात आला आहे, त्याचप्रकारे नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे नेट संरक्षण होणे तसेच इतर तातडीच्या दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे अतिआवश्यक आहे अशी मागणी पर्यटक, नेरळ, माथेरानच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रसायनीत पावसाचे धुमशान
१रसायनी : गुरुवारी संध्याकाळी पाऊस सुरू झाला आणि शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला. शुक्रवारी दुपारी १२.१० वा. सुरू झालेला पाऊस रसायनी परिसरात दुपारी २.१० वा.पर्यंत चांगलाच बरसला. मोहोपाड्यात साफ केलेले नाले ओसंडून काळे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरले, यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
२पाताळगंगा एमआयडीसी मुख्य रस्त्यालगत रसायनी पोलीस ठाणे आहे. मुळातच हा भाग सखल आहे. पोलीस ठाण्यासमोरून आर.सी.सी. बांधलेला व फरशीने झाकलेला नाला आहे. हा नाला पुढे सिद्धेश्वरी कॉर्नर जवळ एमआयडीसीच्या मोठ्या नाल्याला मिळतो. त्याच्या बॅकवॉटरमुळे व पोलीस ठाण्याच्या समोर रस्ता आहे.
३त्याला थोडा उतार असल्याने त्यावरून येणार पाणी पोलीस ठाण्यात शिरले होते. कर्मचाºयांनी बाके, खुर्च्या व महत्त्वाचे साहित्य सुरक्षित स्थळी हलवले होते. पाताळगंगा नदीचीचे पाणी पोलीस ठाण्यात गेलेले नाही. काही नुकसान झाले नसल्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी
माणगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे व माणगाव-श्रीवर्धन रस्त्याचे काँक्रीटीकरण यामुळे शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिरल्याची घटना घडली. यामुळे कर्मचारी, रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची तारांबळ उडाली.
माणगाव-श्रीवर्धन रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याकरिता मोर्बा फाट्यावर झालेला भराव व तिथेच लागून असणारे उपजिल्हा रुग्णालय यामुळे रस्त्याचे पाणी निचरा न होऊ शकल्याने सर्व पाणी उपजिल्हा रुग्णालयात शिरले. हे पाणी जनरेटरमध्ये घुसल्यामुळे वीज खंडित झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. नव्याने होणाºया या रस्त्यामुळे ही परिस्थिती पावसामुळे वारंवार निर्माण होणार आहे.
या रस्त्याचे काम चालू असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून संबंधित प्रशासनास वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता; परंतु त्यावर उपाययोजना न केल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. तरी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी.
- डॉ. गौतम देसाई, वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी)
नागोठण्यात तलाव, विहिरी भरल्या
नागोठणे : अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या पावसाचे गुरुवारी सायंकाळपासून दमदार आगमन झाले आहे. पावसाने बळीराजा सुखावला असून सोमवारपासून या भागात भातलावणीच्या कामाला सुरुवात होईल, असे शेतकºयांकडून सांगण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी सुरुवात केल्यानंतर रात्री ९ नंतर पावसाने विश्रांती घेतल्यावर शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडण्यास प्रारंभ झाल्याने तलाव तसेच विहिरी पाण्याने भरून गेल्या आहेत. काही नागरिक घरातील प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या, जुन्या गाद्या, कपडे गटारात फेकत असल्याने काही भागात पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने गटारे साफ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांची त्यानिमित्ताने धांदल उडाली होती.
मुरुडमध्ये एक दिवसात १८८ मि.मी. पाऊस
मुरुड : तालुक्यात गुरु वारी सकाळी ६ वाजता पावसाने सुरुवात केली. संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस तालुक्यात बरसला आहे. एका दिवसात १८८ मिली मीटर एवढा पाऊस फक्त मुरुड तालुक्यात बरसला आहे.
रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा मुरुडला सर्वाधिक मोठा पाऊस पडला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या पटांगणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पाहावयास मिळाले. पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. सतंतधार पावसामुळे लोकांनी घराच्या बाहेर पडणे टाळल्यामुळे बाजारात शुकशुकाट होता.