अलिबाग : मंगळवारी दुपारी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. कुठेही अतिवृष्टी व जीवितहानी झाली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र,या पावसाने तयार झालेल्या भातपिकाला जिल्ह्यातील काही भागांमध्ये थोड्या प्रमाणात फटका बसला आहे.
भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. बुधवारी दिवसभर अंधूकसे वातावरण कायम राहिले होते.
अचानक पडणाऱ्या या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
पनवेल परिसरात पावसाची दमदार हजेरी
कळंबोली : पनवेल परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. कामोठे, कळंबोली, पनवेल परिसरात सखल भागांत पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. पनवेल परिसरात साडेपाचच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. कळंबोली येथील करवली नाका, सेक्टर १४, एलआयजी भागात पाणी साचले होते. पनवेल ओरियन मॉलसमोर रस्त्यावर दीड फूट पाणी साचले होते. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे परिसरातील वसाहतीत पाणी साचले होते. त्याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. कळंबोली सर्कल येथे वाहतूककोंडी झाली होती. कामोठे सेक्टर ६ ए येथे महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. पावसाने तासभर पनवेल परिसरात दमदार बॅटिंग केल्याने सखल भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते.