नेरळ : जगाच्या नकाशावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी अनेक नवनवे उपक्रम राबविले जात आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम आणि सोयीसुविधा नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येत आहेत. आता या पर्यटनस्थळी माणसाला मिळणारी ऊर्जा आणि उपचार पद्धती यावर आधारित इंद्रधनू प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, महालक्ष्मी वानखेडकर यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मुंबई-पुणेच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सरकारच्या उदासीनतेमुळे या माथेरानचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याचा आरोप माथेरानकरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना सोयीसुविधा कमी पडत असल्याने माथेरान नगरपरिषदेने एक पाऊल पुढे टाकत अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. माथेरानच्या पर्यटनाला गती मिळण्यासाठी माथेरानमध्ये महालक्ष्मी वानखेडेकर यांच्या संकल्पनेतून इंद्रधनू हा प्रकल्प माथेरानमध्ये राबविण्याचा निर्णय माथेरान नगरपरिषदेने घेतला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या उपक्रमाला मान्यता दिली असून निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सावंत यांनी दिली.इंद्रधनू ही सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक रंगसंगतीवर आधारित उपचारपद्धती आहे. उत्तम आरोग्याचे हे प्रतीक आहे. बुद्धिवर्धक आरोग्यवर्धक सौंदर्यवर्धक अशी इंद्रधनू थेरेपी असल्याची माहिती महालक्ष्मी वानखेडेकर यांनी दिली. जगातील पाहिले इंद्रधनू प्रकल्प माथेरानमध्ये होणार असल्याचे वानखेडकर यांनी सांगितले. तसेच माथेरान नगरपरिषदेने या प्रकल्पाला मान्यता दिली असून पर्यावरण पूरक विकास करण्याचा उद्देश असून उपक्रमामुळे पर्यटनात वाढ होऊन रोजगार उपलब्ध होणार असल्याचे नगराध्यक्ष्यांनी सांगितले.