पावसाचा जोर कायम;रोह्यात कुंडलिकेने गाठली इशारा पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:15 PM2019-07-10T23:15:37+5:302019-07-10T23:15:42+5:30
अलिबाग : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी चांगलाच दणका दिला, त्यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर भिरा धरणाचे ...
अलिबाग : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी चांगलाच दणका दिला, त्यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर भिरा धरणाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत. सातत्याने अशा पडणाऱ्या पावसाने नदीकाठी राहणारे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस पावसाचा असाच जोर राहणार असल्याने अलर्ट जारी केला आहे.
बुधवारी सकाळपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शेतीची कामे मात्र खोळंबली आहेत. सकाळी सोसाट्याच्या वाºयासह पाऊस पडत असल्याने काही शाळांनी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीचे वर्ग बंद ठेवले होते. ११ व १२ जुलै रोजीही रायगड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाºयासह पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पर्यटनस्थळे, धबधबा, गड-किल्ले येथे जाताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत १२८५.०४ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. बुधवारी दिवसभर पावसाने झोडपल्याने शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर मजुरी पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस रात्रभर सुरूच राहिल्यास सावित्री, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्या धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, रोह्याच्या कुंडलिका नदीनेही इशारा व धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत तीन वेळा ओलांडली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य कक्षाने पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाला दिला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रोह्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसाने बुधवारीही हैदोस घातला. शहरातील मुख्य हमरस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेले, कुंडलिका नदीवरील कोलाड येथील डोलवहाळ बंधाºयाने २३ मि.मी. ही इशारा पाणीपातळी गाठल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. नदीने रौद्ररूप धारण केले असून दुपारपासून रोहा-अष्टमी दरम्यान असलेल्या पुलाला लागून पाणी वाहू लागल्याने भीती व्यक्त होत आहे. सायंकाळपर्यंत पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पाणी वाढण्याची शक्यता आहे.
धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका नदीच्या दोन्ही बाजूकडील रोहा-अष्टमी शहर आणि लगतच्या गावांना बसणार आहे. त्याचप्रमाणे येथील धाटाव एमआयडीसीत कामासाठी मोठ्या संख्येने येणाºया कामगारांनाही बसणार आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी असणाºया गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.