रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:45 PM2019-07-25T22:45:38+5:302019-07-25T22:45:48+5:30
गेल्या २४ तासांत १५०० मि.मी. पाऊस । सखल भागांमध्ये शिरले पाणी । पोस्ट ऑफिसची भिंत कोसळली
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल एक हजार ५०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा तडाखा जोरात असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले होते. समुद्रकिनारी असणाऱ्या घरांमध्ये तसेच चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पावसाच्या तडाख्याने अलिबाग पोस्ट आॅफिसची संरक्षक भिंत कोसळली. धुवाधार पावसामुळे रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गुरुवारी ओलांडली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संथगतीने पुढे सरकत होती. पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून धुवाधार बरसण्यास सुरुवात केली. गेल्या २४ तासांत सर्वाधिक १८० मि.मी. पाऊस पेण तालुक्यात झाला, तर सर्वात कमी ४५ मि.मी. पावसाची नोंद सुधागड-पाली तालुक्यात झाली आहे.
गुरुवारी पावसाचा जोर कायम होता, तसेच मुंबई-गोवा या राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे एसटीच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. प्रवाशांना तासन्तास एसटीची वाट पाहत बसावे लागल्याचे दिसून आहे. कुं डलिका नदीच्यापाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी असणाºया गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. या संततधार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी करपणाºया भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
नेरळ-माथेरान घाटात जुने झाड कोसळले
नेरळ : गुरुवारी दुपारच्या सुमारास नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे झाड रस्त्यावरच कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे माथेरान घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दरम्यान, रस्त्यावर प्रवाशांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या सहकार्याने दोन तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सुरुवात केली आहे. दोन दिवस सतत पावसाने सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी जमिनीत दलदल होऊन झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच गुरुवारी दुपारच्या सुमारात नेरळ-माथेरान घाट रस्त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. भले मोठे झाड असल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली होती आणि त्यामुळे माथेरान घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला.