जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम; भिरा धरणाचे तीन दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:05 PM2019-07-08T23:05:04+5:302019-07-08T23:05:16+5:30
काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुन्हा पावसाने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिरा धरण तुडुंब भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. त्याप्रमाणे डोलवहाळ बंधाºयातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा धुमधडाका हा असाच पुढील तीन दिवस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने जनजीवन पुरते विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही कालावधीसाठी पावसाने उघडीप घेतली होती, मात्र रविवारी दुपारपासूनच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री सोसाट्यांच्या वाºयासह पाऊस पडत होता. सोमवारी दुपारपर्यंत संततधार सुरू होती.
रविवारपासून बरसणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी, अंबा नदी तसेच महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
भिरा धरणाने इशारा पातळी ओलांडल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्या दरवाजातून १८४ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गाव वाड्यांना सतर्क राहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटीलपासून उच्च अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
महाड : गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातून वाहणाºया सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नद्यांचे पाणी महाड शहरात घुसले. यामुळे शहरातील सखल भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावित्री व गांधारी नद्यांची पातळी वाढल्याने पुराचे पाणी दस्तूरी मार्ग , अर्जुन भोई मार्ग तसेच गांधारी मार्ग, क्रांती स्तंभ मार्ग पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेत घुसण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारपेठेतील व्यापारी व रहिवाशांनी सामानाची आवराआवर करण्याची लगबग सुरू होती.
महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरीक्षक किशोर शिंदे आदींनी भोईघाट परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. महाड नगरपरिषदेतर्फे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. शहर व तालुक्यातील नदीकिनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रविवारी रात्रभर महाबळेश्वर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पातळीत सोमवारी अचानक वाढ झाली त्यामुळे शहर परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. पूरस्थितीमुळे सोमवारी दुपारनंतर शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.