बाप्पाच्या उत्सवात पावसाचे विघ्न, रस्ते जलमय; वाहतुक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 02:47 AM2019-09-05T02:47:49+5:302019-09-05T02:47:55+5:30
नवी मुंबईत मुसळधार; रस्त्यावर पाणीच पाणी; नाले तुडुंब
1दोन दिवसांपासून नवी मुंबईसह मुंबई व उपनगरांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. याचा परिणाम बुधवारी सकाळपासून सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर झाल्याचे पहायला मिळाले.
2रस्त्यांवर अनेक फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी त्या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. अशाच प्रकारामुळे मुंबईतील अनेक मार्गावरील तसेच उरण मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्यात आल्या. उरण मार्गावर जासई येथे रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याने वाहतुक ठप्प होवून वाहनांच्या अनेक कि.मी पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक तास अडकून राहिलेल्या प्रवाशांना पर्यायी पायपीट करावी लागली. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात उरण मार्गावर भेडसावणारया या समस्येवर पर्याय काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप प्रवासी मोहीनी धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.
3रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यामुळे या मार्गावरील एनएमएमटीच्या बस दुपार नंतर बंद करण्यात आल्या. त्याशिवाय मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दादर तसेच सायन मार्गे जाणारया बसही बंद करण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.
4खासगी प्रवासी वाहने देखिल जागोजागी अडकून पडल्याने मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारयांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
शहरात वाहतूकीचे तीनतेरा
मंगळवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर जोर धरल्याने नवी मुंबई शहर जलमय झाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात गुडघाभर पाणी साचले होते. तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. सायन-पनवेल महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरातील बहुतांशी भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
२१ व्या शतकातील शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार
नवी मुंबई शहराला नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते परंतु गेल्या काही वर्षात शहरातील नियोजनात केलेल्या विविध बदलांमुळे शहराला पावसाचा फटका बसू लागला आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पदपथ आणि पावसाळी गटारांची रूंदी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे यावर्षी पाणी तुंबण्याच्या घटनांत वाढ झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने बंद पडण्याचे प्रकार घडले. एमआयडीसीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाली. शिरवणो, सानपाडा आदी भुयारी मार्गांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद झाले होते.
गणेशोत्सव मंडळाकडून खबरदारी
साचलेल्या पाण्यामुळे अनेक सोसायट्यांचे विद्युत मीटर रूम पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून महावितरणने काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. तसेच गणोशोत्सव मंडळांना देखील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत केला होता.
रेल्वेसेवाही झाली विस्कळीत
मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेरुळावर पाणी साचल्याने पनवेल ते मानखुर्द पर्यंतच रेल्वे धावत होत्या. अशातच बेलापुर येथे एका ठिकाणी रुळाखालील भाग खचल्याने काही वेळासाठी रेल्वेसेवा प्रभावीत झाली होती. मात्र त्यानंतर धिम्या गतीने पनवेल ते मानखुर्द दरम्यान रेल्वे सोडण्यात आल्या.तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते ठाणे दरम्यान ५ ते १० मिनिंटाच्या फरकाने रेल्वे धावत होत्या. यामुळे शहरातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.