पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार!; गाढी नदी परिसरातील रहिवासी वस्तीत शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:02 AM2019-07-28T00:02:17+5:302019-07-28T00:02:21+5:30
शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.
पनवेल : मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाढी नदीला पूर आल्याने पनवेल शहरातील नदीकाठी वसलेल्या वस्तीत पाणी शिरल्याने अनेक रहिवाशांना याचा फटका बसला. शनिवारी पनवेल तालुक्यात सुमारे २४०.२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. भारतनगर व कोळीवाडा या ठिकाणच्या घरात पाणी शिरले होते. शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पावसाच्या रुद्रावतारामुळे अनेकांनी घरातून बाहेर न पाडण्याचाच निर्णय घेतला.
पनवेल शहरातील बंदर रोड परिसरात असलेल्या न्यायालयातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. जुना मुंबई-पुणे महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या मार्गावर ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणी चार फुटापर्यंत पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. नवीन पनवेल बाँठिया शाळेजवळ, कळंबोली, कामोठे या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ग्रामीण भागात तळोजे मजकूर, आपटा कोळीवाडा, वावंजे गाव, पळस्पे-गणेशवाडी, फरशिपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
तालुक्यातील कासाडी, कर्णावती नद्यांनीदेखील धोक्याची पातळी ओलांडली होती. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थादेखील ठप्प झाली होती. पनवेल शहरात अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने रिक्षासेवा बंद झाली होती. प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत निश्चित स्थळी पोहोचावे लागले. हार्बर मार्गावरील पनवेल सीएसटी रेल्वेसेवादेखील अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली होती. या मार्गावर रेल्वे उशिरा धावत होती. यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
गाढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पालिका, तसेच तहसील प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला. सायन पनवेल महामार्गासह कळंबोली मुंब्रा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. रोहिंजन टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
संरक्षण भिंत कोसळली
नवीन पनवेल सेक्टर १६ मधील एका सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर झाड कोसळल्याची घटना शनिवारी घडली. अतिवृष्टीमुळे झाड उन्मळून सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर पडले. यामुळे संरक्षण भिंत कोसळली.
आयुक्तांनी घेतली आपत्कालीन पथकाची भेट
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका मुख्यालयात सर्व अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींची बैठक घेतली. सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिली. पालिका क्षेत्रातील आपत्कालीन केंद्रात आवश्यक सामुग्री पुरविण्याचे आदेश दिले. अफवांना बळी न पडता आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन देशमुख यांनी दिले.