रायगडमध्ये चार दिवसांपासून पावसाचे थैमान : जनजीवन विस्कळीत; मच्छीमारांना मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:09 AM2020-07-08T01:09:42+5:302020-07-08T01:10:51+5:30
रायगडच्या विविध भागांत पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून देण्यात आला आहे. रायगडात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे.
अलिबाग - गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मच्छीमारांनाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. अलिबाग शहरातील पीएनपीनगर, तळकरनगर आदी ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले होते.
रायगडच्या विविध भागांत पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून देण्यात आला आहे. रायगडात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसाबरोबर जोरदार वारे वाहत असल्याने नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. ३ जूनला झालेल्या चक्र ीवादळाच्या आठवणी अजून ताज्या असल्याने, नागरिकांना वादळी वारे वाहायला लागले की भीती वाटते. तसाच काहीसा अनुभव रायगडकर गेल्या दोन दिवसांपासून घेत आहेत. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने ७ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता दिलेल्या इशाºयानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अलिबागमध्येही दुपारी सव्वाबारा वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
नागरिकांनी कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर आणखी चार दिवस या लाटांची उंची वाढत जाणार आहेत. त्यामुळे जीवरक्षक दल, सागरी सुरक्षारक्षक, मच्छीमार सोसायट्यांचे सदस्य यांना उधाणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून समुद्र किनारी तैनात राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापनाने दिल्या आहेत.
वादळाची अफवा : उधाणाचा नेहमी फटका बसणारे पेण तालुक्यातील विठ्ठलवाडी, दादर, अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, बहिरीचा पाडा, मुरुड तालुक्यातील नांदगाव, आगरदांडा, श्रीवर्धनमधील जीवना बंदर यांसारख्या किनाऱ्यालगतच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. तीन दिवस समुद्राला उधाण येणार आहे, ही बातमी होती. मात्र, रविवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा आणि पाऊस कोसळू लागल्यामुळे रायगडकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. पुन्हा चक्रीवादळ येणार, अशी अफवा किनारपट्टीवर पसरली होती. मात्र, प्रशासनाने चक्र ीवादळ येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि नागरिकांच्या जीवात जीव आला. रविवारी श्रीवर्धनसह पलीकडे मंडणगड, दापोली तालुक्यात वादळी वारा सुरू झाला. सोमवारी, ६ जुलै रोजी सायंकाळी अलिबाग, मुरुडमध्येही सोसाट्याचा वारा सुटला होता. नुकतेच बसवलेले पत्रे पुन्हा उडून जातात की काय? अशी भीती निर्माण झाली होती. चक्रीवादळ येणार असल्याचा कुठलाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट के ले.
मुसळधार पावसात लौजी परिसर तुंबला
वावोशी : बिल्डरांनी इमारती उभारताना पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे, शनिवारपासून मुसळधार पावसाच्या तडाख्याने लौजीत पाणी घुसले. यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, बिल्डर व नगरपरिषद प्रशासन यांच्या उदासीनतेबाबत संताप व्यक्त होत आहे.
खोपोली शहरातील लौजी परिसरात अनेक इमारतींमध्ये शेकडो रहिवासी राहत असून, अनेक टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. येथील भविष्यात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसून, कोरोना महामारीत नालेसफाई झाली नाही. यामुळे शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसात लौजी येथील उदयविहार परिसरातील अनेक सखल भागांत व मोकळ्या जागेत पाणी साचले आहे. यामुळे इमारतींच्या आवारात पाणी घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
कुं डलिका नदीची पातळी वाढली
१ अलिबाग : रायगडमधील प्रमुख सहा नद्यांपैकी रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोका पातळीपर्यंत आपली मजल मारली आहे. पाऊस असाच कायम पडत राहिला, तर कुंडलिका नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा जास्त जाणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीची इशारा पातळी २३ मीटर इतकी आहे, धोका पातळी २३.९५ मी असून, सध्या नदीची पातळी २३.२५ मीटर इतकी आहे.
२ मात्र, दिवसभर असाच पाऊस राहिला तर इशारा पातळीपेक्षा जास्त जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आंबा नदीची धोका पातळी ९.०० मीटर असून ६.२५ इतकी सध्याची पातळी आहे. सावित्री नदीची धोका पातळी ६.५० मीटर इतकी असून, सध्याची इशारा पातळी ३.६० आहे. पाताळगंगा नदीची धोका पातळी २१.५२ मीटर आहे, तर सध्या तिची पातळी १७.६० इतकी आहे.
सुधागड तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
पाली : पावसाळा पुन्हा एकदा सुरू झाला असून, संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रायगडमधील इतर तालुक्यांप्रमाणेच सुधागडलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह रायगडमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाने थोडी विश्रांती घेतली, परंतु पुन्हा एकदा जुलै महिन्यात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. गेले तीन ते चार दिवस पावसाची कायमची संततधार सुरूच आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाºयानुसार पाऊस वाºयासह जोरदार पडत आहे. नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. आंबा नदीही भरभरून वाहू लागली आहे. पावसाची ही संततधार सुरूच राहिली, तर आंबा नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.