विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने, २८ धरणांपैकी रोहे तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा तालुक्यातील पाभरे या धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने या दोन्ही धरणांतून विर्सग सुरू केला आहे. पावसाचा तडाखा असाच कायम राहिल्यास उर्वरित २६ धरणेही धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यात मान्सून चांगलाच स्थिरावला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पाऊस चांगलाच बरसत आहे. रायगड जिह्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित २८ धरणे येतात. संततधार पावसामुळे धरणे चांगलीच भरून गेली आहेत. रोहे तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सुतारवाडी धरणाची पूर्ण संचय पातळी ही ९३ मीटर आहे. गेल्या २४ तासांमध्ये या भागात ७० मिलीमीटर पाऊस पडला आहे, तर १ जूनपासून आतापर्यंत ७२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणामध्ये २.६६४ दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने त्यामधून ५६४.१५७ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणातून ६२२.२७७ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरण परिसरात गेल्या २४ तासांमध्ये ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत ८४४ मि.मी. पाऊस पडला आहे. धरणामध्ये आजच्या स्थितीमध्ये १.७८७ दलघमी पाणीसाठा आहे.पावसाचा तडाखा असाच सुरू राहिल्यास उर्वरित २६ धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊन, ते धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वेळास येथील समुद्रकिनाऱ्याची धूपलोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : समुद्रातील पाण्याला उधाण आल्याने श्रीवर्धन तालुक्यातील किनारी पाण्याची पातळी वाढली आहे. मोठमोठ्या लाटांमुळे तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या वेळास आगर समुद्रकिनारपट्टीची मोठ्या प्रमाणात झीज होत असून, येथील झाडे उन्मळून पडत आहेत. यामुळे या किनाऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होत असून उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, पर्यटक व स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.वेळास समुद्रकिनारा शांत असला, तरी भरतीच्या वेळी लाटा झाडाच्या खोडांवर येऊन आदळत असतात. त्यामुळे किनारपट्टीची झीज होऊन झाडे कोलमडून पडण्याच्या घटना घडत आहेत. येथील समुद्रकिनारा हा अतिशय सुंदर असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहवयास मिळते. त्यातच समुद्रकिनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक सुरूची झाडे येथील सौंदर्यामध्ये एक वेगळीच भर टाकतात आणि हीच झाडे भविष्यात नष्ट झाली, तर वेळास समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.सुरू प्रकारची झाडे वाचवणे काळाची गरज असल्याने, या गंभीर घटनेकडे मेरिटाइम बोर्ड, तसेच स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि समुद्राच्या भरतीच्या लाटांनी किनारपट्टीची होणारी धूप थांबवावी, या मागणीसाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सरपंच बाबुराव शिलकर यांनी सांगितले. वेळास समुद्रकिनाऱ्यापासून दोनशे मीटरहून कमी अंतरावर वेळास-आदगाव मार्ग आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच उरलेली सुरूची झाडे उन्मळून पडत राहिली तर समुद्राच्या लाटा वेळास-आदगाव मार्गावर येतील.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
By admin | Published: June 29, 2017 2:59 AM