रायगड - जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे अलिबाग, राेहा, माणगाव आणि महाड तालुक्यातील विविध भागांमध्ये जलमय झाला आहे. महाड तालुक्याला सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. काळ नदीला पुर आल्याने माणगाव-चिंचवली येथील साेन्याची वाडीमध्ये अडकून पडलेल्या 86 नागरिकांना वाचवले आहे, तर एक युवक काळ नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे.
भारतीय हवामान विभागाने 4 ते 6 ऑगस्ट 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दाेन दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला चांगलेच झाेडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबा आणि कुंडलीका नद्यांनी इशारा पातळी आेलांडली हाेती, तर सावित्री नदीने धाेका पातळी ओलांडल्याने तीन राैद्ररुप धारण केल्याने महाड तालुक्यातील काही भागांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांची धाकधुक वाढली आहे. महाड तालुक्यातील नडगावतर्फे बिरवाडीमधील काळभैरव नगर येथे दाेन घरांच्या मागे दरड काेसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. एका घरात काेणीच राहत नव्हते तर दुसऱ्या घरातील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आले आहे. महाड-दापाेली विन्हेरे मार्गावर दरड काेसळल्याने तेथील वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे.
माणगाव तालुक्यातील चिंचवली येथील साेन्याचीवाडीला पुराच्या पाण्याने वेढल्याने सुमारे 100 नागरिक अडकून पडले हाेते. प्रशासन, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने 86 नागरिकांना दुपारपर्यंत रेस्क्यू करण्यात यश आले हाेते. सर्वांना गोरेगावमधील ना. म.जोशी विद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. उर्वरीत नागरिकांसाठी बचाव कार्य सुरु आहे. काळनदीमध्ये अशुताेष कुचेकर (वय.19) हा युवक वाहून गेला आहे. त्याचाही शाेध घेण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे कळमजे पुलावरुन काळ नदीचे पाणी वाहत असल्याने मुंबई-गाेवा महामार्ग ठप्प झाला आहे. काेलाड-विळे-निजामपूर-बाेरवाडी-डालघर या मार्गे वाहतुक वळवण्यात आली आहे. मात्र या वळवण्यात आलेल्या मार्गावरुन अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गाेवा महामार्गावर वाहतुक काेंडी झाली आहे. माेर्बा घाटातही दर काेसळल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे.
अलिबाग तालुक्यातही पावसाने आपले राैद्ररुप दाखवले आहे. बोर्ली-मांडला ते महाळुंगे काकळघर दिशेने जाणाऱ्या मार्गावरील मांडला गावापासून जवळच सोमाई नदीला पुर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. रामराज पुलावरुन देखील पुराचे पाणी जात असल्याने वावे-रामराज हा मार्ग देखील वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा संर्पक तुटला आहे.