पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला
By Admin | Published: September 11, 2015 11:38 PM2015-09-11T23:38:38+5:302015-09-11T23:38:38+5:30
यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
कर्जत : यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील भात शेती चांगली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भात शेती सुकू लागली होती त्यातच पावसाअभावी विविध रोगांचा प्रादुर्भाव भातपिकावर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पीक वाचावे म्हणून नदी, नाल्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी पंप लावून शेतात पाणी घेण्याचा निर्णय घेतला. शेते पाण्याने भरली अन् वरु णराजाने कृपा केल्याने शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.
यावर्षी पावसाने सर्वांनाच रडविले. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात भातपीक चांगले आले असताना पावसाने दांडी मारली भातपिके सुकू लागली. विविध रोगांनी पिकाला पछाडण्यास सुरु वात झाली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावरील हसू लोप पावले. गणपतीचा सण जवळ आला तरी त्याला काही सुचत नव्हते. हातातोंडाशी आलेले पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाल्यालगत असलेल्या भात शेतीला पंप लावून पाणी दिले व शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु हे सधन शेतकऱ्याला जमले व ज्यांची शेती नदी, नाल्यांच्या जवळ आहे त्यांचा फायदा होत होता. अन्य शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. राजानाला विभागातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी अर्ज तयार ठेवले होते. पंपाने पाणी घेऊन शेते भरली आणि पावसाने सुरु वात केल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर)
एसआरटी पद्धतीने केलेले भातपीक पंधरा दिवसांपूर्वी दृष्ट लागण्यासारखे होते मात्र पावसाच्या अभावी पिके सुकू लागली म्हणून आम्ही नाल्यामधील पाणी पंप लावून शेतात घेतल्याने पिकात पुन्हा जीव आला. त्यातच परतीच्या का होईना पावसाने सर्वांनाच तूर्तास तारले आहे.
- हरिश्चंद्र ठोंबरे,
शेतकरी, कोषाणे