वैभव गायकर,पनवेल: पनवेलमध्ये रविवार, दि.21 हा पावसाचा सुपर संडे ठरला. दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. यामुळे सायन-पनवेल महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. याव्यतिरिक्त पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली आणि ग्रामीण एमआयडीसी परिसरातील सखल भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
पनवेल तालुक्यात रविवारी 7 वाजता सुरु झालेला पाऊस सायंकाळी उशिरा पर्यंत सुरु होता.रविवार असल्याने पुन्हा एकदा पांडवकडा धबधबा,आदई धबधबा,गाडेश्वर डॅम परिसरात पर्यटकांनी पुन्हा एकदा गर्दी केलेली पहावयास मिळाले.या पर्यटकांना आवरताना पोलिसांची दमछाक झालेले देखील पहावयास मिळाले.
पनवेल उरण नाका, कळंबोली सेंट जोसेफ शाळेकडून कारमेल कॉन्हेंटकडे जाणारा रस्ता,पडघा गाव परिसर,पळस्पे फाटा आदी ठिकाणी पाणी साचले होते.खांदा कॉलनीत भले मोठे रेनट्री कोसळून पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने तासाभरात वृक्ष बाजुला करण्याचे काम केले. पनवेल शहरातील गाढी नदी काठी वसलेले कच्छी मोहल्ला परिसरात दरवर्षीप्रमाणे पाणि साठले होते.
पनवेल दिवा लोहमार्गांवरील तळोजा फेज वन आणि फेज २ ला जोडणारा महत्वाच्या भुयारी मार्गांत पाणि साठल्यामुळे नेहमी प्रमाणे हा मार्ग बंद करण्यात आला होता.