अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी आपत्तीवर मात करीत गावासाठी आपत्ती निधी जमा केला आहे. या निधीतून त्यांनी वेळोवेळी समुद्राच्या पाण्यापासून संरक्षक बंधारे बांधून आपल्या गावाला वाचविले आहे. एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकल्याने गावकीने एकजुटीने हा निर्णय घेत प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे बोलले जाते.
अलिबाग तालुक्यातील शहापूर हे गाव समुद्रालगत असणारे निसर्गरम्य गाव आहे. या ठिकाणी भातशेतीसह मत्स्यशेतीचा उद्योग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. येथील जमिनींवर विविध खासगी कंपन्यांचा डोळा आहे. परंतु १० वर्षांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी गावाच्या विकासाचे मॉडेल सरकारला सादर केले आहे. आपापली शेती वाचविण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच पुढे असतात. त्यांची शेती समुद्रालगत असल्याने उधाणामुळे समुद्ररक्षक बंधारे फुटण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. आॅगस्ट २०१९ रोजी शहापूर येथील संरक्षक बंधाºयांना एकूण २१ खांडी (संरक्षक बंधारे तुटणे) गेल्या होत्या. खारे पाणी शेतामध्ये घुसल्याने शेती नष्ट होणार असल्याने ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न बघता स्वत:च काम करण्याचे ठरविले. या सर्व खांडी गावातील महिला-पुरुषांनी कमरेभर पाण्यात उभे राहून वेळप्रसंगी होडीतून माती आणून स्वखर्चाने बंधारे बांधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले होते. त्यांनी तो शब्द पूर्ण करीत सात लाख रुपये रोजगार हमी योजनेतून मंजूर केले.या कामात सहभागी न होणाºया कुटुंबांना प्रति दिन ३०० रु पयांचा दंड आकारला. दरम्यान प्रत्येक जिल्ह्याचा स्वत:चा आपत्कालीन निधी असावा, अशी संकल्पना डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती. त्यावर प्रेरित होत शहापूर गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी त्यांचे सहकारी राकेश पाटील, रामचंद्र भोईर, अरविंद पाटील यांना जमा रक्कम आपत्ती कोषात जमा करण्याचे आवाहन केले.गावकीचा सुमारे तीन लाख आपत्ती निधी सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केला. महाराष्ट्रातील आपत्ती निधी असलेले ते पहिले गाव ठरण्याची शक्यता आहे.आपत्तीमुळे ओढवणाºया संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपत्ती निधी असणे गरजेचे आहे. निधी जमा करताना गावकीला आवाहन केले की ते स्वखुशीने मदतीचा हात पुढे करतात, असे गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी सांगितले.1एमआयडीसीने येथील काही जमिनींचे संपादन केले आहे. त्यामुळे त्या जमिनींच्या खांडी गेल्याने खारे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसते. खारे पाणी शेतामध्ये गेल्याने जमिनीला आणि पिकांनाही धोका संभवतो. आमच्या जमिनी आम्हाला वाचवाव्याच लागणार आहेत. मात्र एमआयडीसी यातून जबाबदारी झटकत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.2एमआयडीसीने जबाबदारी झटकली असल्याने त्याचा निषेध म्हणून बुधवार,२६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसीय भजनी आंदोलन करण्याचे नक्की केले आहे.