अलिबाग - पांडबादेवी मित्र मंडळ रायवाडीने आक्षी खाडीत हात होडींच्या शर्यतीचे आयोजन सोमवारी धुळवडीच्या निमित्ताने केले होते. या शर्यतीत रायवाडी व साखर येथील 12 हात होडी सहभागी झाल्या होत्या. हात होडी चालवण्याची कसब तरुण पिढीत टिकून रहावे, आणि पर्यटक हाताने व्हल्हे मारणाऱ्या होडींकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान होड्या आणि मोठ्या होड्या अशा दोन गटांत या स्पर्धा पार पडल्या.
छोट्या गटात प्रथम क्रमांक मित जग्गू -भाग्येश जग्गु, दुसरा क्रमांक यज्ञेश पाटील-गणेश वादळे यांनी पटकावला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक अनिकेत बानकर-दुर्गेश बानकर, दुसरा क्रमांक प्रथम लाल-ओंमकार वादळे तर तृतीय क्रमांक बाॅक्स फायटर-विपूल बानकर यांनी पटकावला. त्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले.
दरवर्षी स्पर्धेसाठी होडी चालक जय्यत तयारी करत असतात. आपल्या होडीचे रंगकाम केली जाते, नवीन व्हल्हे तयार केले जातात. होडी आक्षी पुलावरून सुटल्यावर 3 किलो मिटर अंतरावर फेरी मारून परत येतात. ही स्पर्धा पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. जातांना होडी अतिशय स्पीडमध्ये जातात, पण येताना होडीचा समतोल राखून आणाव्या लागतात. चालकांचे कसब यावेळी पणाला लागते.