अलिबाग- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी अलिबाग दौऱ्यावर आहेत. त्यामुळे रायगडकरांना राजकीय मेजवाणी काय मिळणार याकडे साऱ्याचे लक्ष आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाभियानचे आयोजन केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबाद साधणार आहेत, तर केंद्रीयमंत्री नारायण राणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे असणार आहेत.
शासकीय कार्यक्रम संपल्यावर नारायण राणे विरोधकांचा कसा समाचार घेणार कि शांततेत जाणार हे पाहण्याची उत्सुकता नागरीकामध्ये आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १५ जानेवारी रोजी रविकिरण हॉटेल, अलिबाग येथे पत्रकारांसाठी ' जमीन परीषद ' आयोजीत केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार आहेत. यामध्ये राज ठाकरे कसा खरपूस घेणार हे पाहण रंजक ठरणार आहे.