इथे पैसे भरा आणि मरा; राज ठाकरेंचं पुन्हा 'मिशन टोल नाका', थेट गडकरींना केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 01:17 PM2023-08-16T13:17:49+5:302023-08-16T13:21:34+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
पनवेल- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पनवेल येथे निर्धार मेळावा होत आहे. या मेळाळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपसह सर्व पक्षांना टोला लगावला. या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा टोल नाक्यावरुन सरकारवर टिकास्त्र सोडले.
रोहितकडे नेतृत्व म्हणून पाहते, तो बोलायला लागला की आबा बोलतात असं वाटतं; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक
राज ठाकरे म्हणाले, समृद्धी महामार्गाला फेन्सिंग टाकलेले नाहीत. त्या महामार्गावर बकरी, हरणे, गुरे येतात. अचानक गाडीच्या आडवी जणावरे आली तर करायचे काय. त्या महामार्गावर आतापर्यंत साडेतीनशे माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. आम्ही फेन्सिंग लावणार नाही पण टोल लावणार. इथे पैसे भरा आणि मरा, अशी सरकारे असतात का?, असा सवालही ठाकरे यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गासाठी नितीन गडकरींना फोन केला
"राज्यात कुठे जायचे झाले की, युटर्न मारून जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावर १५,५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की, मी लक्ष घातले पण कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरू नाही ना, असंही राज ठाकरे म्हणाले. कोकणातील जमिनी आहेत त्या धडाधड परप्रांतीयांच्या घशात गेल्या आहेत. नाणार रद्द होतोय हे पाहून बारसू सुरु झाले. भोळसट कोकणी बांधव चिरीमिरीसाठी जमीनी विकून मोकळा होतोय. पाच हजारात एकर जमिन कधी एकत्र पाहिलीय का? कुंपणच शेत खातेय,असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
कोकणातील महामार्गाचे काम गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी २०२४ पर्यंत लोकांसाठी खुला होईल असे सांगितले आहे. पण आताच्या गणपतीचे काय? आतापर्यंत मृत्यूमुखी झालेल्यांचे काय? अडीज हजार लोकांचे जीव गेलेत. गावी, फिरायला गेलो होतो आणि जीव गेले. सगळे ढिम्म आहेत. एकमेव कारण आहे, आम्ही काहीही केले, कसलेही रस्ते दिले तरी एका कोणत्यातरी विषयावर ही लोक मतदान करणार, हा धंदा आहे. एखादा रस्ता पुढच्या २५-३० वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे. तो सहा महिन्यात खराब झाला पाहिजे. नवीन टेंडर नवीन पैसे, नवीन कंत्राट नवीन टक्के. खोके खोके असे ओरडतायत ना त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही त्यांनी, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.