वर्षभरानंतरच प्रकटली राजापूरची प्रसिद्ध गंगा; चौदाही कुंडांमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 12:54 AM2021-05-01T00:54:49+5:302021-05-01T00:54:55+5:30
चौदाही कुंडांमध्ये पाणी
राजापूर (जि. रत्नागिरी) : राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे शुक्रवारी सकाळी आगमन झाले आहे. गतवर्षीही एप्रिल महिन्यात गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर वर्ष होताच गंगामाई पुन्हा प्रकटली आहे. गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, काशीकुंड तुडुंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्राेत सुरू झाला आहे.
सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी गंगा प्रकट होते व तीन महिन्यांनी अंतर्धान पावते, असा प्रघात आहे. मात्र, अलीकडच्या कालावधीत आगमन व निर्गमनाच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती, तर काही वर्षांपूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधी खूपच लांबला होता. यावेळी १ वर्ष १४ दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले आहे. सकाळी गावातील ग्रामस्थ त्या भागात गेले असता गंगेचे आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरलेली होती. सर्वांत मोठे असणारे काशीकुंड पूर्ण भरल्याने गोमुखातून पाणी वाहत होते. मूळ गंगेचा प्रवाह मोठ्या स्वरूपात वाहत होता.
प्रवेश बंदच
गतवर्षी काेराेनाचे सावट असतानाच गंगेचे आगमन झाले हाेते. मात्र, काेराेनामुळे गंगाक्षेत्री जाण्यास बंदी घालण्यात आली हाेती. त्यामुळे भाविकांना गंगास्नानाचा आनंद लुटता आला नव्हता. यावर्षीही सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षीही गंगास्नानाची पर्वणी साधता येणार नाही.