-आविष्कार देसाईअलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अॅड.राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन उमेदवारांमध्येच थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि मनसे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची भाजपासोबत युती असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. २१ मे रोजी मतदान होणार असल्याने मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला दोन्हीकडून चांगलेच उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आमदार सुनील तटकरे यांनी पक्षांतील निष्ठावंतांना डावलत मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार रहा, असे संदेश मिळालेले खोपोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताजी मसुरकर यांना त्यांची तलवार म्यान करावी लागली आहे. मसुरकर यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे बोलले जाते. अनिकेत तटकरे यांची ओळख ही सुनील तटकरे यांचे चिंरजीव अशीच आहे. त्यांनी अद्यापही ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद अशी निवडणूक लढवलेली नसतानाही केवळ वडिलांच्या कृपाआशीर्वादाने त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांनी आधीही घराणेशाहीला थारा देत बंधू अनिल तटकरे, पुतण्या अवधुत तटकरे यांना आमदारकी दिली आहे, तर जिल्हा परिषदेवर मुलगी अदिती हिला निवडून आणले आहे.अनिल तटकरे आणि सुनील तटकरे बंधूंमधील वाद जगजाहीर आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिल्यास शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज ४८४ येते, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ३०६ होते. मनसे, अपक्ष आणि स्वाभिमानी पक्ष यांची बेरीज ही १३९ होते. ३०६ आणि १३९ यांची बेरीज केल्यास ४४५ होते. याचाच अर्थ युतीकडे अद्यापही ३९ मते अधिक असल्याचे दिसते.भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली असली, तरी कोकणात डोईजड झालेली शिवसेना खरोखरच भाजपाला परवडणारी आहे का असा प्रश्न आहे. स्वाभिमानी पक्षाच्या मतांवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचाच होल्ड आहे. तसेच त्यांचे शिवसेनेबरोबर चांगलेच हाडवैर आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याकडून मदत मिळेल या भ्रमात शिवसेनेच्या उमेदवाराने न राहिलेलेच बरे आहे. सुनील तटकरे हे राजकीय डावपेचांमध्ये माहीर आहेत. नारायण राणेंची मदत मिळणार याची खात्री पटल्यावरच कदाचित त्यांनी अनिकेत याला रणांगणावर तर उतरवले नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.च्७ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शिवसेनेचे अॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे हे रिंगणात राहतील, तर शिवसेनेचे किशोर जैन आणि अदिती तटकरे हे आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतील.च्शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस अशीच सरळ लढत होणार आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी तटकरे यांनी विजयी सोंगट्या ठेवल्या असतील तशाच शिवसेनेकडे नाहीत, असेच चित्र सध्या आहे.
राजीव साबळे, अनिकेत तटकरे यांचे उमेदवारी अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 6:59 AM