बहीण-भावाच्या प्रेमाला महागाईचा चटका; राखीचे भाव वाढले

By निखिल म्हात्रे | Published: August 29, 2023 02:27 PM2023-08-29T14:27:51+5:302023-08-29T14:30:59+5:30

राख्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ

Raksha Bandhan 2023 Rakhi prices increased in Raigad district | बहीण-भावाच्या प्रेमाला महागाईचा चटका; राखीचे भाव वाढले

बहीण-भावाच्या प्रेमाला महागाईचा चटका; राखीचे भाव वाढले

googlenewsNext

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: बहीण-भावाच्या स्नेहाचे प्रतीक असणारा रक्षाबंधन हा पवित्र सण हा उद्यावर येऊन ठेपला आहे. शहरात आणि ग्रामीण भागातून बहिणींची आपापल्या बंधुराजाला साजेशी आणि सुबक अशी राखी खरेदी करण्याची धावपळ बाजारात दिसून येत आहे. सणाविषयी प्रचंड उत्सुकता असली तरी यंदा मात्र बहीण-भावाच्या रक्षाबंधन सणावर महागाईने बडगा उगारला आहे. राख्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भावांसाठी बहिणींची राख्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाची दरवाढ झाल्याने राखीचा भाव वाढला आहे. ग्राहकांचा सध्या अपेक्षित प्रतिसाद नसल्याने दुकानदार नाराज आहेत. बाजारात सध्या नवनवीन डिझाईनच्या राख्या दिसत आहेत. पूर्वी दोरीवर मोठा गोंडा असलेल्या राख्या आता दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक तरुणी नाजूक डिझाईन असलेल्या राख्यांना पसंती देत आहेत.

शाळकरी मुली आपल्या लहान भावांसाठी कार्टूनच्या राख्यांना पसंती देत आहेत. महिलांकडून देवांचे फोटो असलेल्या राख्यांना जास्त मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. बाजारात विविध रंगाच्या व लहान मुलांसाठी विशेष कार्टूनच्या राख्या विक्रीस आल्या असून सगळ्यांचे दर वाढलेत. बाजारपेठा राख्यांनी सजल्या असून, त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. राखी खरेदीला प्राधान्य देताना विविध प्रकारची आवडनिवड पाहिली जाते. भावाच्या हाताला शोभेल अशी राखी निवडण्यासाठी महिला, युवती दुकानांत योग्य राख्या शोधत आहेत.

पब्जीमुळे बदललेला राख्यांचा ट्रेंड आणि कार्टून्सची क्रेझही कायम असून, दर वर्षी येणारे वेगळेपण यंदाही राख्यांनी जपले आहे. सोन्या-चांदीच्या प्लेटलेट राख्या बाजारात दाखल झाल्या आहे. त्यांची पारख व खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बहीणभावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून होणारा रक्षाबंधन सण येत्या गुरुवारी आहे. बदलत्या काळानुसार राख्यांतही बदल झाले आहेत. बाजारपेठेत चार दिवसांपासून राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. ठिकठिकाणी मनमोहक राख्यांचे स्टॉल सजले आहेत. खासकरून महिला, युवतींची राख्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. दुकानदारांनी पारंपरिक राख्यांबरोबरच यंदा छोटा भीम व सुती राख्यांनाही मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. दहा रुपयापासून तीनशे रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत.

कच्च्या मालात दरवाढ झाल्याने यंदा राख्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे राखी विक्रेत्यानी सांगितले, पाच रुपयांपासून तर पाचशे रुपये डझन असे राख्यांचे दर आहेत. याशिवाय अनेक जण ऑनलाइन राख्या खरेदीला पसंती देत आहेत.
-ओबेराॅय, राखी विक्रेता

सगळ्या भावांना राखी खरेदी करून घरातील प्रत्येक वस्तू व मंदिरासाठी राखी खरेदी करावी लागते, परंतु यदा भाव गडगडल्याने राखी खरेदी करताना विचार करावा लागत आहे.
- श्वेता मांडवकर, गृहिणी

Web Title: Raksha Bandhan 2023 Rakhi prices increased in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.