पोलादपूर : येथील आंबेनळी घाटात २८ जुलै, २०१८ रोजी झालेल्या अपघातात दापोली कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला सहा महिने झाले, तरीदेखील पोलीस यंत्रणेला तपासात काहीही हाती लागलेले नाही. चार दिवसांपूर्वी या अपघाताबाबत मृत बसचालक प्रशांत भांबिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे मृतांचे सर्व नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यामुळे अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतांचे नातेवाईक व सर्वपक्षीय राजकीय नेते पोलादपूर येथे शनिवारी पोलीस चौकीवर मोर्चा घेऊन आले.आंबेनळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा, अशा भावना या वेळी नातेवाइकांनी व्यक्त केल्या, तसेच आंबेनळी अपघातात बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप दापोलीकरांकडून व नातेवाइकांकडून करण्यात आला. सावंत देसाई यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी, तसेच त्यांची नार्काे टेस्ट करावी. त्यामुळे अपघातामागचे खरे सत्य समोर येईल, असे निवेदन दापोलीकरांनी पोलिसांना दिले. या प्रकरणात २६ जानेवारीपर्र्यंत कारवाई करावी, अन्यथा दापोलीकर संताप मोर्चा काढतील, तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करू, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 4:18 AM