प्रकाश कदमपोलादपूर : दुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात आरोग्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. उपचाराबाबत शासन दरबारी कमालीची अनास्था असल्याने ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व आठ उपकेंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र पदे रिक्त असून सुविधांची वानवा आहे. यामुळे रु ग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम २०-२५ वर्षांपूर्वी बांधलेल्या छोट्या इमारतीमध्ये सुरू आहे. आजूबाजूच्या ४२ गावांतील २२ हजार रुग्ण येथे उपचारासाठी येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तीन उपकेंद्रे आहेत. वाढणाºया रुग्णांना ही इमारत कमी पडत आहे. आवश्यक औषधे रुग्णांना मिळत आहेत, मात्र काही औषध बाहेरून खरेदी करावी लागतात असे रुग्ण सांगतात. रुग्णांकरिता एक रुग्णवाहिका येथे उपलब्ध आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत.मात्र सध्या या दोन्ही जागा रिक्त आहेत. सध्या विन्हेरे आरोग्य केंद्रातील डॉ. घोडके हे तात्पुरत्या स्वरूपात येथे कार्यरत आहेत. येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी निवासी नसल्याने त्यांच्या निवासस्थानात मोकाट जनावरांचा मुक्त वावर आहे, तर शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दवाखान्यातील कर्मचारी येथे कोणतीही स्वच्छता ठेवत नाहीत. आगामी काळात जर येथे वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी मिळाले नाही तर रात्री येणाºया रुग्णांची गैरसोय ही ठरलेलीच. या आरोग्य केंद्रातर्गत उमरठ, साखर, कापडे बु. ही तीन उपकेंद्रे येतात. मात्र, येथील उमरठ व साखर ही केंद्रे फक्त नावालाच आहेत येथे कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा लोकांना मिळत नाही.
पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाºया सुविधा येथे अपुºया कर्मचारी वर्गामुळे देता येत नाहीत. रिक्त पदे, सुविधांची वानवा या प्रमुख समस्या असून याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन सुधारण्यास तयार नाही. रात्री अपरात्री अत्यवस्थ रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार लांबच, नातेवाइकांना अधिक उपचारासाठी पुढे नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना नो एंट्री असा अलिखित नियम या आरोग्य केंद्रात बनला आहे. जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. येथे मुख्य आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाईलाजाने नातेवाईक खासगी रुग्णालयाची वाट धरतात. गंभीर असलेल्या रुग्णांना अधिक उपचारासाठी महाड शासकीय रुग्णालय किंवा मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले जाते. त्यामुळे ग्रामीण रुग्णांची परिस्थिती रामभरोसे आहे. परिणामी ग्रामीण रुग्णांसह अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची सेवा मिळत नाही.
गेली अनेक वर्षे वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने त्रिवेणी विभागातील लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टर मिळावेत अशी मागणी जनतेच्या वतीने केली. - तुकाराम केसरकर, माजी रुग्ण कल्याण समिती सदस्य
वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाची इमारत ही नादुरुस्त झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तसेच अपुरे कर्मचारी असल्याने स्वच्छतेकडे विशेष लक्ष देता येत नाही. - डॉ. सुधीर घोडके, वैद्यकीय अधिकारी