अलिबाग : रामनवमी उत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्सहात व शांततेत पार पडला. १४७ मंदिरात हा उत्सव आयोजित केला होता तर ११४ ठिकाणी पालखी-मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. रामनामात दंग भक्त व मंदिरासमोर सुरु असलेले भजन कीर्तने असे भक्तीमय वातावरण होते. तर बुधवारपासून हनुमान जयंतीच्या सप्ताहाला ही सुरुवात झाली आहे.
अलिबाग शहरातील रामनाथमधील आंग्रेकालीन पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाली. अडीचशे वर्ष पुरातन असलेल्या या राममंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पुरोहितांच्या उपस्थितीत श्रींची विधिवत पूजा करून दुपारी १२.३० वाजता यांच्या हस्ते रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी राम जन्मोत्सवावर प्रवचन-कीर्तन झाले.
अलिबाग शहरातील ब्राह्मण आळीत राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी महिलांनी गर्दी केली होती. येथे ही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील नवखार, रेवस, आवास,रांजणपाडा येथेही रामजन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम पार पडले. रेवस कोळी वाड्यात जन्मोत्सवापूर्वी सप्ताहाची जुनी परंपरा आहे. यावर्षीही येथे रामनवमी साजरी झाली.
आगरी, कोळी, माळी समाजातील लोकांचे राम मंदिर श्रद्धास्थान आहे. मुरूड तालुक्यातील एकदरा, सावली मिठागर यासह जिल्ह्याच्या अनेक भागात रामजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. दुपारी जन्मोत्सव तर संध्याकाळी पालखी मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भक्तगण भजन-कीर्तनात रमले होते. सायंकाळपर्यंत भाविक दर्शनासाठी मंदिरात येत होते.