रणगाडा अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर; तरुणांना मिळेल प्रोत्साहन - डाॅ. विजय सूर्यवंशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:20 AM2020-12-26T05:20:39+5:302020-12-26T06:47:42+5:30
Alibag beach : तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता.
अलिबाग : सध्या सीमेवर लढण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरुणांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर सैनिक व अधिकारी म्हणून रुजू व्हावे या दृष्टीने तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी युद्धात पराक्रम गाजविलेला रणगाडा अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर ठेवला असल्याचे कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. लाेकमतच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक हा देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित केला होता.
तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी, यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते ते शुक्रवारी पूर्णत्वास नेले आहे. अलिबाग येथे रणगाडा मिळावा यासाठी माजी संरक्षणमंत्री सुरेश भामरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी तत्काळ मागणी पूर्ण केल्याने शुक्रवारी टीकेटी ५५ रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढवीत असल्याचे डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, तरुणाईला संरक्षण दलात जायला प्रेरणा देण्यासाठी तसेच अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तेथे रणगाडा बसवण्याची संकल्पना मनात आली. त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आणि स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे, तर दुसरीकडे स्थानिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे आता अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
पर्यटनवाढीला चालना मिळणार - निधी चौधरी
अलिबाग हे पर्यटनस्थळ आहे. अलिबागला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला असल्याने त्याच्या सौंदर्यांत भर पडली आहे. अलिबागचे हेच निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी अलिबागमध्ये येत असतात. तसेच समुद्राचा आनंद लुटतात. मात्र आता अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘वॉर ट्रॉफी’ म्हणून बोलले जाणारा रणगाडा बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता पर्यटनवाढीला चालना मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.
रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार - पाटील
अनेक युद्धे गाजवणारा हा रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कल्पना मांडली आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर आज त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने माॅडेल म्हणून ओळखले जाणार आहे, असे आमदार जयंत पाटील यांनी भाषणात सांगितले.