`1 लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळावी तसेच अलिबागचे ऐतिहासिक महत्त्व अधाेरेखित व्हावे यासाठी अलिबागच्या मुख्य समद्रकिनारी युद्धात शाैर्य गाजवलेला रणगाडा ठेवण्यात आला आहे. पुणे-खडकी येथील लष्करी कॅम्पमधून शुक्रवारी सकाळीच हा रणगाडा येथे दाखल झाला आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लाेकमत’ला दिली.‘लाेकमत’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा अनाेखा देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने त्यांची ही मागणी मान्य केली. ती मान्य हाेऊन शुक्रवारी रणगाडा अलिबागमध्ये दाखल झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे अलिबागमधील नव्हेतर, तमाम रायगडकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. अलिबागला सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे या पराक्रमी महान विभूतीचा इतिहास लाभलेला आहे. त्याचा फायदा पर्यटन वृद्धीसाठी निश्चितच हाेईल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ हा कार्यक्रम ‘लाेकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित करण्यात आला हाेता. तरुणाईला संरक्षण दलात जाता यावे तसेच अलिबागच्या प्रेक्षणीय समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तिथे रणगाडा बसविण्याची संकल्पना मनात आली हाेती. त्याची स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे. - डाॅ. विजय सूर्यवंशी, तत्कालीन जिल्हाधिकारी
उच्च दर्जाचे सुशाेभीकरण nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यासाठी विशिष्ट जागा केली आहे. त्या ठिकाणी उच्च दर्जाचे सुशाेभीकरण करण्यात येणार आहे. nतसेच रणगाड्याची अप्रतिम अशी रंगरंगाेटीही करण्यात येणार आहे. यासाठी दाेन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२१ रोजी रणगाड्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. nअलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ताे स्थानिकांसह पर्यटकांच्या आर्कषणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती येणार आहे.