सोशल मीडियावर रंगतेय विधानसभेची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:10 AM2019-07-23T00:10:24+5:302019-07-23T00:10:51+5:30
राजकीय कार्यकर्ते सज्ज : नेत्यांच्या कामांचा ऊहापोह
आगरदांडा : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तथापि आतापासूनच सोशल मीडियावर विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर समर्थकातच ग्रुपवर जुंपत असल्याने सर्वांची करमणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक इच्छुक उमेदवार लागला आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी, विरोधक, इच्छुक उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे.
मतदार संघाचा भावी आमदार कोण असेल याचा एक्झिट पोल घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो. यामध्ये ज्या गटाचा कार्यकर्ता हा एक्झिट पोल घेतो त्या गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला पसंती देतात त्यामुळे हा एक्झिट पोल देखील बोलाचीच कढी बोलाचाच भात ठरू लागली आहे. निवडणूक जशी जवळ येईल तशी येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे महत्त्व देखील वाढू लागले आहे. नेते, नेत्यांची मुले, नातेवाईक, युवा नेते वाढदिवसाला हजेरी लावीत आहेत. त्यामुळे गावात कार्यकर्त्यांच्या मागे किती लोक जमा आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीत किती जण राहणार हा चिंतनाचा विषय तरी देखील या सर्व कार्यक्रमाचा फार्स सोशल मीडियावर आहे.
या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीची समाजोपयोगी कामे देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सोशल मीडियावर अनेक ग्रुपवर पहायला मिळत आहे. प्रत्येक गट पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या कार्याची किंवा समारंभाची माहिती सोशल मीडियावर टाकतो, त्याला समर्थक उत्तर देणारी पोल विरोधी गटाचा पक्षाचा कार्यकर्ता टाकत असतो, त्यामुळे निवडणुकीपूर्वीच सोशल मीडियावर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र रणांगण तापत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा निकाल फिरवणे तरुणाईच्या हातात आहे. त्यामुळे या सोशल मीडियावर होणारी चर्चा देखील निवडणुकीत कलाटणी देणारी ठरू लागली आहे.
विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर ग्रुप चालवणाºया कार्यकर्त्यांना चांगले बळ दिले असल्याची चर्चा असून विधानसभा निवडणूक अजून काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे.