समुद्रकिनार्यांवर रंगोत्सव, जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी; पर्यटकांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:46 AM2024-03-26T10:46:03+5:302024-03-26T10:46:09+5:30
जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सर्वच रंगीबेरंगी झाले होते.
अलिबाग : रविवारी होळी पूजन झाल्यानंतर सोमवारी २५ मार्च रोजी सगळीकडे धूलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. रायगड जिल्ह्यात रंगाच्या रंगात प्रत्येकजण रंगून गेला होता. जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सर्वच रंगीबेरंगी झाले होते.
रविवारी २४ मार्च रोजी रात्री बारा वाजता होळीदहन केल्यानंतर रंग लावून धूलिवंदन सण सुरू झाला. सकाळी लवकर उठून बच्चे कंपनी ही एकमेकाला रंग लावून रंगीबेरंगी झाले होते. बच्चे कंपनीसह आबालवृद्धही या रंगाच्या सणात न्हाहून गेले होते. अनेकजण हे नैसर्गिक रंगांचा वापर करत होते. रायगड जिल्ह्यात धूलिवंदन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकही दाखल झाले होते.
अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, नागाव समुद्रकिनारी तर धूलिवंदन खेळण्यासाठी आणि समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या वेळी एकमेकाला रंग लावून सणाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. रंगाची उधळण केल्यानंतर सर्वजण हे समुद्रात मौजमस्ती करण्यात दंग झाले होते. अनेक जण ग्रुपने शहरात फिरून एकमेकाला रंग लावत होते. त्यामुळे सगळीकडे रंगमय वातावरण निर्माण झाले होते. वरसोली समुद्रकिनारी स्थानिकसह पर्यटक यांनी रंगाची उधळण केली. वरसोली समुद्रकिनारा रंगाने न्हाहून गेला होता.
दक्षिण रायगडात १५ दिवस होळी
कोकणात गणपती आणि होळी या दोन सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. रायगडातही होळी सण तितक्याच पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो.
दक्षिण रायगडात होळीच्या माळरानावर १५ दिवस होळीचा सण साजरा होतो. समुद्रालगतच्या जिल्ह्यातील गावासह कोळीवाड्यात होळी उत्साहात साजरी होते.
सुपारी, आंबा, सावरच्या होळ्या सजविण्यात आल्या होत्या. पुरणाचीपोळी नैवेद्य दाखवून तिचे पूजन करण्यात आले होते.
७३ ठिकाणी मिरवणुका
जिल्ह्यात एकूण ३ हजार ९८५
होळ्या पेटवल्या. यात सार्वजनिक
२ हजार ९१७, तर १ हजार ५९
खासगी होळ्या होत्या. ७३ ठिकाणी होळीच्या मिरवणुकाही काढण्यात आल्या होत्या.