नागोठणेत रणजी सामना : महाराष्ट्र सर्व बाद ४३४ धावा; झारखंड दुसऱ्या दिवसाअखेर २ बाद २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:58 PM2020-01-12T23:58:41+5:302020-01-12T23:59:18+5:30
रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या.
नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या षट्कातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटका देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला, तेव्हा झारखंडची २ बाद २ अशी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे अझीम काझी आणि विशांत मोरे या दोन फलंदाजांनी केलेली शतके, ही आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. झारखंडकडून उत्कर्ष सिंगने पाच बळी घेतले.
महाराष्ट्र झारखंड रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी चिवट झुंज देत दोन्ही फलंदाजांनी शतके केल्याने महाराष्ट्राला ४३४ धावांपर्यंत मजल मारता आली. काझीने ५४४ मिनिटे खेळपट्टीवर राहून १४०, तर मोरेने ३२८ मिनिटे खेळून १२० धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपायला १९ मिनिटे शिल्लक असताना अक्षय पालकर १८ धावांवर राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर सुमित कुमार याच्या हातात झेल देऊन बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव ४३४ धावांवर संपुष्टात आला. झारखंडच्या पहिल्या षट्कात चौथ्या चेंडूवर कुमार देवव्रतला तंबूत धाडले. त्याच्या जागेवर आलेल्या उत्कर्ष सिंगने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्यानेही यष्टिरक्षक विशांत मोरे याच्या हाती झेल देऊन आपला बळी दिला. एका षट्कातच पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केल्याने झारखंडाची अवस्था २ बाद २ अशी झाली आहे.