उरणमधील रानसई धरणाची पाणी पातळी खालावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:42 AM2021-03-02T00:42:57+5:302021-03-02T00:43:09+5:30

६४ दिवस पुरेल इतकेच पाणी

Ransai dam in Uran lowers water level | उरणमधील रानसई धरणाची पाणी पातळी खालावली 

उरणमधील रानसई धरणाची पाणी पातळी खालावली 

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून नागरिकांना फक्त पुढील  ६४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उरणकरांचा  पाणीपुरवठा या  आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली.
उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र या वर्षी रानसई धरणात येत्या एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांना पुरेल इतकाच ६४ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच  कडक उन्हाच्या तडाख्याने रानसई धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची  पातळी आणखीनच कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मागील वर्षात पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळेही उरणच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ बसणार नाही याची धोरण उरण एमआयडीसीने स्वीकारले आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली. 


हेटवणेतून घेतले जाते पाणी 
एमआयडीसीकडून दहा एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. मात्र सिडकोकडून पाच एमएलडी इतके मिळते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उरणकरांना पावसाळ्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वाया न घालवता जपून वापर करावा असे आवाहनही काळेबाग यांनी केले आहे.

Web Title: Ransai dam in Uran lowers water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.