लोकमत न्यूज नेटवर्कउरण : तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण ओव्हरफ्लो झाले. जून आणि जुलै महिन्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि डोंगर माथ्यावरून वाहणारे पाणी थेट रानसई धरणात येवून मिसळत असल्याने जुनै महिन्यातच धरण दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरजे यांनी दिली.उरण तालुक्यातील ग्रामीण आणि शहराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जूननंतर मागील काही दिवस पावसाने दडी मारल्याने धरण भरले नसल्याने उरणकरांवर पाणीटंचाई तसेच कपातीचेही संकट ओढवण्याची शक्यता वाढली होती. मात्र त्यानंतर मागील काही दिवसांपासून सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे उरण शहर, ग्रामीण आणि औद्योगिक भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई, पुनाडे धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडला आहे.उरण शहर, ग्रामीण भागातील ३५ गावे आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्राला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ११६ फूट उंचीचे धरण सोमवारी सकाळी ९.२५ वाजल्यापासून ओव्हरफ्लो होवून वाहू लागले आहे. उशिराने बसरलेला पाऊस आणि डोंगरातून येणाऱ्या पाण्याने का होईना रानसई धरण काठोकाठ भरून वाहू लागले असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरजे यांनी दिली.उरण पूर्व भागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन आदि १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडला आहे. तर चिरनेर येथील आक्कादेवीच्या डोंगरात असलेले छोटेखानी आक्कादेवी धरणही ओसंडून वाहू लागले आहे.उरण परिसरात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र धरण क्षेत्रात येणाऱ्या अतिउत्साही पर्यटक आणि निसर्गप्रेमींचा होणाऱ्या त्रासाकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.- आर. डी. बिरजे, उपअभियंता, एमआयडीसी
रानसई धरण झाले ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:59 AM