कर्जत तालुक्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; उत्तरकार्यातील संसर्ग अद्याप थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:23 AM2020-07-02T04:23:51+5:302020-07-02T04:23:59+5:30
नवीन नऊ रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कर्जत : तालुक्यातील कोरोना विषाणू यांचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची संख्या दीड शतकाजवळ जाऊन पोहचली आहे. त्यात उत्तरकार्यात संसर्ग अद्याप थांबण्याचे नाव घेत नसून आज आणखी चार नवीन रुग्णांची भर त्यात पडली आहे, तर कर्जत शहराबरोबर नेरळ, शेलू, किरवली, आणि टेंभरे या ग्रामीण भागातील गावातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
कर्जत शहरालगत असलेल्या किरवली ग्रामपंचायतीमधील बोरवाडी गावामध्ये झालेल्या उत्तरकार्यातील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १ जुलैच्या चार नवीन रुग्णांचा समावेश आहे. २३ जून रोजी बोरवाडीमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता आणि आजपर्यंत तेथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७ पर्यंत पोहचली आहे. १ जुलै रोजी कर्जत शहरातील दहिवली भागातील पाटील आळी येथील ४५ व ४० वर्षीय दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एका वकिलाचा समावेश आहे. तसेच बोरवाडी संबंधी कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाची ३०वर्षीय पत्नी आणि त्या कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या मोबाईल शॉपीमध्ये काम करणारा एका २४ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या २२ वर्षीय भावाला देखील लागण झाली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत उत्तरकार्यात सहभागी २७ लोक कोरोनाबाधित आहेत.
कर्जत शहरा नजीकच्या किरवली ग्रामपंचायती मधील ज्ञानदीप सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील एका ३२ वर्षीय तरुणाला लागण झाली आहे तर नेरळ गावातील एक ५२ वर्षीय व्यापाºयाला काही आजारामुळे बदलापूर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती आणि त्यात त्या टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शेलू येथील ३४वर्षीय तरुण कोरोना बाधित झाला आहे. दुसरीकडे कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या टेंभरे गावातील एका ५१ वर्षीय महिलेला कोरोनाने ग्रासले आहे. बुधवारच्या नऊ नवीन रुग्णांमुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४५ वर पोहचली आहे.