लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांसमोर बेड शिल्लक नसून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना नागरिक तरीदेखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुक्तसंचार करताना दिसत आहेत. नागरिकांचा हा बिनधास्तपणा त्यांच्या जिवावर बेतू शकतो. याकरिता सर्वांनी शासन आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली होती. यावेळी नागरिकांनी शासन आदेशाचे पालन करून कोरोनाला हरविले होते. तसेच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेवर विजय मिळवावा. वासांबे मोहोपाडा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढतच आहे. सध्या वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागात २३ एप्रिलपर्यंत एकूण २५१ रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१४ झाली आहे. यात कोरोनावर ५३० जणांनी मात केली आहे, तर ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने होत आहे. मात्र आणखी देखिल नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
चौक मंडलात १,४४५ कोरोनाबाधित रुग्णn१७ एप्रिलपर्यंत चौक मंडलात एकूण १४४५ रुग्णसंख्या असून एकूण ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीकरण सुरू केले आहे तर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लस घेता येणार असल्याने सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. nकोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावा, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा जास्त वापर करावा, असे आवाहन वासांबे मोहोपाडाग्रामपंचायत आणि रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने होत आहे.