उरणच्या पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर अवतरल्या दुर्मिळ पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 04:48 PM2022-11-11T16:48:58+5:302022-11-11T16:51:23+5:30
पीरवाडच्या किनाऱ्यावर सध्या देवदेवता अवतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मधुकर ठाकूर
उरण - उरणच्या पीरवाडी बीचच्या समुद्रात अज्ञात लोकांनी टाकून दिलेल्या पुरातन पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती हौशी पर्यटकांनी पुन्हा किनाऱ्यावर आणून स्थापना केली आहे. त्यामुळे पीरवाडच्या किनाऱ्यावर सध्या देवदेवता अवतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उरणच्या द्रोणागिरी डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी अतिसंवेदनशील असा केंद्राच्या अखत्यारीतील ओएनजीसी प्रकल्प आहे. तर डोंगर माथ्यावर इतिहासाची साक्ष देणारा शिवकालीन ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. या ऐतिहासिक डोंगर परिसरात आदिवासींची वस्ती आहे. द्रोणागिरी डोंगरात भटकंती अथवा उत्खनन अथवा खोदकाम करताना पाषाणात कोरलेल्या देवीदेवतांच्या मूर्ती सापडतात. जंगलात अथवा खोदकामात सापडलेल्या देवीदेवतांच्या दुर्मिळ मूर्ती आदिवासी अथवा हौशी पर्यटक श्रध्देने आणून पीरवाडी बीचवरील समुद्र किनाऱ्यावर आणून ठेवतात.
किनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या या पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती काही अज्ञातांनी समुद्रात टाकून दिल्या होत्या. मात्र समुद्राच्या ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर आढळून आल्यानंतर काही हौशी पर्यटकांनी देवीदेवतांच्या पाषाणी मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर आणून स्थापित केल्या असल्याची माहिती येथील व्यावसायिक दुकानदारांनी दिली. त्यामुळे सध्यातरी पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर देवीदेवता अवतरल्या असल्याचे चित्र आहे.
याबाबत पुरातत्व खात्याशी संपर्क साधला असता हे ठिकाण राज्य पुरातन विभागाच्या अखत्यारीत येत आहे.तरीही पाषाणी मूर्तीचे फोटो व व्हिडीओ पुरातन विभागाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहेत. तज्ञांनीही प्रत्यक्ष पाषाणी मुर्त्याची पाहणी केल्यानंतरच याबाबत अभिप्राय नोंदविता येईल अशी माहिती मुंबई विभागीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.