विनोद भोईरलोकमत न्यूज नेटवर्क पाली : पालीतील अंबा नदीमध्ये दुर्मीळ पाणमांजरांचे वास्तव्य असल्याचे नुकतेच समोर आले आहे. पाणमांजराचे वास्तव्य हे येथील जैवविविधतेसाठी अमूल्य ठेवा असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.वनविभागाने देखील लागलीच याबाबत संवर्धनाचे पाऊल उचलण्याचे ठरविले आहे.पालीतील व्यापारी विजय घावटे हे सायंकाळी अंबा नदीजवळील स्मशानभूमीकडे फिरावयास जातात. ५ ते ६ दिवसांपूर्वी त्यांना पाणमांजरांचा समूह दिसला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वी त्यांना हे पाणमांजर दिसून आले. याबाबत वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांना मंगळवारी (दि. २०) माहिती दिली. त्यांनी ताबडतोब याठिकाणी भेट दिली. तसेच संवर्धन व जनजागृती संदर्भात सकारात्मक पावले उचलली आहेत.सुधागड तालुक्यातील पर्यावरण निरीक्षक तुषार केळकर यांनीदेखील या घटनेमुळे आनंद व्यक्त केला आहे. हे पाणमांजर दुर्मीळ असून, वेळीच यांचे संवर्धन करण्याची गरज आहे, असे केळकर यांनी सांगितले. भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारफुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पाणमांजरांच्या वसाहती असतात. नर, मादी व पिले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या टापूची मालकी प्रस्थापित करतात. भारतात यूरेशियन पाणमांजरे आणि लहान नखी पाणमांजरेही आढळतात. सायंकाळी नियमित नदीजवळ फिरण्यास जातो तेव्हा दोन ते तीन वेळा मला हे पाणमांजर दिसले. यांना समूहात व पाण्याबाहेर आलेले देखील पाहिले आहे. याबाबत जनजागृती व संवर्धन झाले पाहिजे असे विजय घावटे यांनी सांगितले.
संवर्धनाची गरजपाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे आणि उपासमारीमुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे. भारतात १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे. बंदिस्त अधिवासात पाणमांजरांची पैदास करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.पाणमांजराचे प्रकार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सागराने वेढलेले देश वगळता पाणमांजर जगात सर्वत्र आढळते. त्यांच्या एकूण १३ जाती असून, भारतात तीन जाती आढळतात यूरेशियन पाणमांजर किंवा कॉमन ऑटर, गुळगुळीत कातडीचे पाणमांजर किंवा स्मूथ कोटेड ऑटर, लहान नखीचे पाणमांजर किंवा स्मॉल क्लॉड ऑटर. याचे शास्त्रीय नाव एऑनिक्स सायनेरिअस आहे.
अंबा नदीमध्ये पाणमांजराचे अस्तित्व असणे हे चांगल्या जैवविविधतेचे लक्षण आहे. यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मासेमारी करताना यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. बॉंब लावून मासेमारी करू नये. पाणमांजरांना आपले मित्र समजावे. नागरिकांनी देखील पाणमांजराबाबत कोणतीही भीती किंवा अंधश्रद्धा बाळगू नये.- समीर शिंदे,वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड