जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
By राजेश भोस्तेकर | Published: August 16, 2023 03:19 PM2023-08-16T15:19:55+5:302023-08-16T15:20:50+5:30
रायगड जिल्ह्यात ५८ हजार ८३६ दिवाणी, फौजदारी प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
अलिबाग : रायगड जिल्हयातील जिल्हा न्यायालयसह तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये शनिवार ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, १३८ एन. आय. क्ट अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे यांनी केले.
रायगड जिल्ह्यात ५८ हजार ८३६ दिवाणी, फौजदारी प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. ९ सप्टेंबर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये यापैकी २० टक्के प्रकरणे ठेवली जाणार आहेत. लोक अदालत मुळे वादी, प्रतिवादी यांच्यात सलोखा निर्माण करून समंजसपणे प्रकरण मिटवली जातात. त्यामुळे वेळेची आणि पैशाचीही बचत होत आहे. लोक अदालतमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे संख्या कमी होण्यासही मदत मिळत आहे.