राष्ट्रीय लोक अदालत एकूण २४ हजार प्रकरणे निकाली
By निखिल म्हात्रे | Updated: December 10, 2023 19:51 IST2023-12-10T19:51:04+5:302023-12-10T19:51:50+5:30
१८ कोटी ६८ लाख ६३हजार ३१ रुपयाची तडजोड रक्कम वसूल

राष्ट्रीय लोक अदालत एकूण २४ हजार प्रकरणे निकाली
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. वादपूर्व व दाखल अशी एकूण २४ हजार ४७६ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ८२,४६५ वादपूर्व प्रकरणे व १२.०२८ प्रलंबित अशी एकूण ९४,४९३ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी २३०८७ वादपूर्व प्रकरणे व १३८९ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण २४,४७६ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १८,६८,६३,०३१ रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.
९ जोडप्यांचा लोक अदालत मध्ये संसार जुळला -
रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात ९ जोडप्यांचा (पाली १, रोहा ४, महाड ३. पेण १) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे.
मोटार अपघात प्रकरणांमध्ये ४ कोटी २३ लाख २७ हजार इतकी नुकसान भरपाई मंजूर -
जिल्हयामध्ये एकूण ७६ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ४,२३,२७,००० इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, ए. एस. राजंदेकर व पॅनलवरील न्यायाधिशांनी पु ष्पगुच्छ देवून सत्कार केला व प्रतिकात्मक धनादेश दिला. रायगड जिल्हयातील विविध न्यायालयांत २७ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालत्तीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.