लोकमत न्यूज नेटवर्कनागोठणे : नागोठणे शहरातील गुरव आळी भागातील किंग बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळून आल्याची घटना घडली.
सुधागड तालुक्यातील सचिन डोबले यांचा नागोठणे हायवे नाका येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टायर विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी डोबले यांनी दुपारी जेवणाचा डबा न आणल्याने त्यांनी जेवणासाठी एका हॉटेलमधून पावभाजी मागवली. ते पावभाजी खाण्यास गेले त्यावेळेस पावात उंदराची विष्ठा आढळून आली. यावेळी डोबले हॉटेलमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता, हॉटेलमालकाने पाव घेऊन येणाऱ्या फेरीवाल्यास तत्काळ बोलावून घेतले. त्यावेळी फेरीवाल्याने पाव किंग बेकरीतून आणल्याचे सांगितले.
याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात सचिन डोबले यांनी लेखी तक्रार दाखल केली. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील कार्यालयात संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. यावेळी घटनेची तत्काळ दखल घेत अन्नसुरक्षा अधिकारी स. रा. आढाव, व्ही. एस. निकम व पाटील यांनी सायंकाळी नागोठणे येथे येऊन किंग बेकरीतील उत्पादन केलेल्या पाव लाद्यांची तसेच बेकरीची संपूर्ण तपासणी करून पाहणी केली.
उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश
यावेळी अधिकाऱ्यांना बेकरीत उंदरांनी कुरतडलेले पाव, आळी पडलेल्या काही पाव लाद्या, याचबरोबर बेकरीत काही ठिकाणी पडलेल्या उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. येथे उत्पादन केलेल्या पावांची प्रत्यक्ष पाहणी करून अन्नसुरक्षा अधिकारी यांनी किंग बेकरी मालकास उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भातील पत्र नागोठणे पोलिसांना संबंधित अधिकारी वर्गाकडून देण्यात आले आहे.