महिला अत्याचाराचे प्रमाण घटले, अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:15 AM2020-10-19T00:15:03+5:302020-10-19T00:16:57+5:30
महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे.
अलिबाग :महिला सुरक्षिततेबाबत शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याने, रायगड जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत महिला अत्याचाराबाबत १३० गुन्हे दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे हुंड्यासाठी बळी गेला असल्याची एकही तक्रार दाखल झालेली नाही. रायगड पोलिसांनी महिला सबलीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याने, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला व मुलींचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
१ जानेवारी, २०२० ते १७ ऑक्टोबर, २०२० दरम्यान महिलांसंदर्भात रायगड जिल्ह्यात १३० गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये हुंड्यासाठी छळ, बलात्कार, विनयभंग, छेडछाड होणाऱ्या घटनांमध्ये प्रामुख्याने घट झाल्याचे दिसून येत आहे.
अपहरणाच्या घटनांमध्ये झाली वाढ -
प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुली व युवतींचे अपहरण करणे किंवा त्यांना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मागील १० महिन्यांत वर्षभरात या प्रकारच्या १० तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुली व युवतींना समुपदेशन करण्याची अधिक गरज आहे.
महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य
महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेची तक्रार नोंदविण्यात येत आहे, तसेच तक्रारींची दखल घेऊन कठोर कारवाईही करण्यात येणार आहे. महिला अत्याचाराविरोधात शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना पोलिसांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधीक्षक